राजकिय

२०० कोटींच्या रस्ते घोटाळ्यात काँग्रेसचा आवाज दाबण्यासाठी गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र ; आमदारांचा दबाव, स्व.अनिलभैय्या सुंदर मनाचा माणूस,

अहमदनगर दि. १९ जून (प्रतिनिधी) : काँग्रेसने मनपातील २०० कोटींच्या रस्ते घोटाळ्याचा भांडाफोड केला. या घोटाळ्यात शहराच्या आमदारांचे कार्यकर्तेच ठेकेदार आहेत. भ्रष्टाचाराची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. सखोल तपास झाल्यास एसपी ऑफीस हल्ल्याप्रमाणे या घोटाळ्यातील ठेकेदार असणाऱ्या कार्यकर्त्यांना तुरुंगात जावे लागेल. यात राष्ट्रवादीच्या व आमदार समर्थक काही भ्रष्ट नगरसेवकांचा देखील समावेश आहे. त्यांना वाचवण्यासाठी काँग्रेसचा आवाज दाबण्याकरिता स्व.अनिलभैय्या राठोड यांचे नाव आम्ही मनपाला दिले म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून षडयंत्र रचले गेले असल्याचा घाणाघाती आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.

काँग्रेसच्या शिवनेरी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संजय झिंजे, दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, उषाताई भगत, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, अलतमश जरीवाला, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, विलास उबाळे, संतोष जाधव, ॲड. अक्षय कुलट, विकास भिंगारदिवे, प्रणव मकासरे, आकाश अल्हाट, आनंद जवंजाळ, गणेश आपरे, गौरव घोरपडे, शंकर आव्हाड, धनंजय देशमुख, देवराम शिंदे, दीपक काकडे, बाबासाहेब वैरागर आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

काळे म्हणाले, स्व.अनिलभैय्या राठोड हे जननायक होते. जुन्या मनपाला त्यांचे नाव देऊन आवारात पूर्णाकृती पुतळा उभरावा ही काँग्रेसची मागणी आहे. ते दुर्दैवाने अकाली जग सोडून गेले. मात्र शहराचे लोकप्रतिनिधी आणि ज्यांनी भैय्या हयात असताना गद्दारी केली अशा लोकांना त्यांचे नाव या शहरातून कायमस्वरूपी मिटवायचे आहे. अनिलभैय्यांचा फोटो मनपाच्या भिंतीवर चिकटवला म्हणून मनपाची भिंत विद्रूप झाली असे म्हणत आमच्यावर गुन्हा दाखल केला. भैय्या हे मनाने आणि विचाराने नगरकरांच्या मनातील अत्यंत सुंदर आमदार होते. पण त्यांच्या मृत्यू नंतर देखील त्यांच्याबद्दल प्रचंड द्वेष आहे. म्हणूनच शहराच्या आमदारांनी आयुक्तांवर दबाव आणून गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप यावेळी काळे यांनी केला.

अहो आयुक्त, आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची हिम्मत दाखवणार का ? :
आमदारांचा नुकताच वाढदिवस झाला. शहरभर स्वखर्चाने कार्यकर्त्यांचे फोटो टाकत आमदारांनी चौका चौकात फ्लेक्स लावले. यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले. या विद्रुपीकरणाचे फोटोच काळे यांनी पत्रकारांना दाखवले. आयुक्तांकडे हे पुरावे देत लेखी तक्रार करणार असून गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत. आयुक्तांनी हिंमत असेल तर तात्काळ गुन्हा दाखल करून दाखवावा, असे जाहीर आव्हान यावेळी काळे यांनी दिले आहे. जुन्या मनपाचे नामकरण केल्यानंतर उशिराने एक महिन्यानंतर आमच्यावर षडयंत्र रचत गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या बाबीकडे देखील यावेळी काळे यांनी लक्ष वेधले.

आयुक्तांवरच गुन्हे दाखल करा :
जुन्या मनपा कार्यालयाच्या वास्तूवर मनपाचे नावच दिसत नाही. विद्रूप झाले आहे. मनपाच्या दारात भिंतीवर माव्याच्या पिचकाऱ्या आहेत. मनपा आवारात यापूर्वी निरोध सापडले आहेत. वास्तूला रंग उरलेला नाही. जुना कौन्सिल हॉल जळाल्यापासून आजही त्याच भग्न व विद्रूप अवस्थेत आहे. मनपाची संरक्षक भिंत अर्धी पडलेली आहे. मनपा आवारात जागोजागी कचरा पडलेला आहे. याचे देखील फोटो काळे यांनी पत्रकारांना दाखवले. मनपाच्या या विद्रुपीकरणाला आयुक्त स्वतः जबाबदार आहेत. त्यामुळे खरंतर आयुक्तांवरच विद्रुपीकरणाचा गुन्हा तात्काळ झाला पाहिजे, अशी मागणी यावेळी काँग्रेसने केली आहे.

तेव्हा रस्त्याचे विद्युतीकरण झाले नाही का ? :
आमदारांच्या प्रभागातील सिमेंटच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले त्या विरोधात भिंगातून पाहणी करत तक्रार देखील दाखल केली. शहरात चांगल्या रस्त्याची २७ कोटी लाख रुपयांच टेंडर काढून भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला गेला. शहर आजही खड्ड्यांमध्ये हरवलेले आहे. नळाला गढूळ पाणी येत आहे. चौका चौकात, लोकांच्या घरात मनपाच्या ढिसाळ यंत्रणेमुळे कचरा साचलेला आहे. त्यामुळे शहर विद्रूप झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेला सिमेंटचा रस्ता गायब झालेल्या रस्त्यावर काँग्रेसने भ्रष्टाचाऱ्यांना ७० टक्के रस्त्याला ३० टक्के असे घोषवाक्य लिहून निषेध केला. मग त्यावेळी आमच्या विद्रूपीकरणाचे गुन्हे दाखल करण्याची हिंमत का दाखवली नाही ? असा खडा सवाल यावेळी काळेंनी शहराचे आमदार, आयुक्तांना केला आहे. यांनीच शहर विद्रुप केले असल्यामुळे त्यावेळी आमच्यावर ते गुन्हा दाखल करू शकले नाही, असे म्हणायाला काळे यावेळी विसरले नाहीत.

नगरला तुकाराम मुंडेंसारख्या आयुक्तांची गरज :
आयुक्त आमदारांच्या दावणीला बांधले गेले आहेत. केवळ भ्रष्टाचार करण्यामध्ये या मंडळींना रस आहे. राजकीय दबावामुळे कोणताही अधिकारी मनपामध्ये काम करायला तयार नाही. अनेक जण बदली करून गेले आहेत. काही बदली करून घेण्याच्या प्रक्रियेत आहेत. तर अनेक जण सातत्याने रजेवर जात आहेत. त्यामुळे आता तुकाराम मुंडे यांच्या सारख्या खमक्या कार्यक्षम व राजकीय दबावाला बळी न पडता काम करणाऱ्या आयुक्ताची गरज आहे. तशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे यावेळी काळे म्हणाले.

सच्चे शिवसैनिक संतप्त :
अनिलभैय्या हयात असताना काही गद्दारांनी त्यांचा पराभव करण्यासाठी काम केले. हे गद्दार कोण आहेत ते सगळ्यांना माहित आहे. या दुर्दैवी प्रकारामुळे सच्चे शिवसैनिक संतप्त झाले असून ते काँग्रेसच्या पाठीशी आहेत. या गद्दारांना अनिलभैय्यांनी शिवालयातून हाकलून दिले होते. प्रामाणिक शिवसैनिक, नगरसेवक आजही शिवालयाशी एकनिष्ठ आहेत. गुन्हे दाखल केले गेले तरी देखील काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम असून अनिलभैय्यांचा गोरगरिबांना मदत करण्याचा, व्यापाऱ्यांना बळ देण्याचा आणि शहराला दहशतमुक्त करण्याचा विचार काँग्रेसच पुढे नेत राहील. यांच्या सत्ता काळात जर भैय्यांचा पुतळा आणि नाव लावले गेले नाही तर काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर प्रामाणिक शिवसैनिक, अनिलभैय्या प्रेमी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण करेल असे यावेळी काळे यांनी सांगितले.

गोविंद मोकाटे करण्याच्या धमक्या :
काँग्रेस कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर दहशत केली जात आहे. या संदर्भात मनपा माझी विरोधी पक्ष नेते दशरथ शिंदे, सावेडी विभाग प्रमुख अशोक शिंदे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस तपास सुरू आहे. आयटी पार्क प्रकरणात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर देखील खोटे गुन्हे दाखल केले गेले. युवक काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला आम्ही स्वतःच्या पायावर व्यावसायिकदृष्ट्या पूर्ण उभे केले. आता तुझा व्यवसाय बंद पाडतो. तुझी रोजी रोटी बंद करतो, असे त्याला धमकावण्यात आले. तुमच्या मुलाच्या जीवाचे बरे वाईट करू, असे कुटुंबियांना धमकवण्यात आले. त्याची गोविंद मोकाटेंप्रमाणे बनावट क्लिप तयार करण्यात आली असल्याची माहिती त्यानेच आम्हाला सांगितली आहे. काळे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घे. खोटंनाट स्टेटमेंट दे. राजीनामा दे. असं धमकी सत्र सुरू आहे. काही कार्यकर्त्यांना तर तुमचा गोविंद मोकाटे करू अशा धमक्या दिल्या जात आहेत. प्रलोभन, अमिष दाखवली जात आहेत. काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. मात्र जे गद्दार उडाले ते कावळे, राहिले ते मावळे. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणारा शहरात काँग्रेस एकमेव पक्ष असल्याने काँग्रेस तोडण्याचे काम आमदारांकडून दहशत करत केले जात असल्याचा आरोप यावेळी काळेंनी केला आहे.

गद्दारांना क्षमा नाही :
ज्यांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःच्या तुंबड्या भरल्या आणि आता दहशत, प्रलोभन, आमिषाला बळी पडून काँग्रेसच्या विरोधात गरळ ओकायला सुरुवात केली आहे अशा गद्दारांना कोणत्या ही परिस्थितीत क्षमा केली जाणार नाही. प्रमाणिक काँग्रेस कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असा इशारा यावेळी काँग्रेसमध्ये राहून गद्दारी करणाऱ्यांना काळेंनी दिला आहे.

शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा :
शहरात सध्या जमिनी बाळकवणाऱ्यांची टोळी शहर लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने सक्रिय आहे. या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटातील काही प्रमुख नेत्यांनी भूमिका घेतली आहे. ही भूमिका जनहिताची असून काँग्रेस या भूमिकेला पाठिंबा देत आहे. अशा प्रकरणांमध्ये ज्यांच्यावर अन्याय होत आहे अशा लोकांनी काँग्रेसशी संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम काँग्रेस करेल, असे यावेळी काळे यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे