राखी पौर्णिमा हा बहीण भावाच्या नात्यातील प्रेम वाढविणारा सण – अर्चनाताई पाटोळे 📍 *सावेडीतील युवती, महिलांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंना राखी बांधत केले रक्षाबंधन साजरे

अहमदनगर (प्रतिनिधी) : राखी पौर्णिमा हा बहीण भावाच्या नात्यातील प्रेम वाढविणारा पारंपारिक सण आहे. आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळत राखी बांधत असतात. भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारी मी पूर्ण करेल असे अभिवचन या निमित्ताने बहिणीला देत असतो. सावेडीतील युवती, महिलांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले. किरण काळे हे शहरातील महिला, युवती भगिनींच्या मदतीला धावून येणारे नेतृत्व आहेत, असे प्रतिपादन यावेळी अर्चना पाटोळे यांनी केले.*
यावेळी उषाताई भगत, राणीताई पंडित, नेहा कूडिया, अमृता कानवडे, मोमीन सय्यद, ज्योतीताई साठे, वृषाली गावडे, ललिता मुदीगंटी, निर्मला कोरडे, मनोरमा बुलाखे, नीलम जगताप, वैष्णवी भवार, प्रियांका मोरे, वर्षाताई जगताप, कोमलताई शिंदे, शारदाताई कर्डिले, शितल भोसले, दीप्तीताई काळे आदींसह महिला, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना ज्योतीताई साठे म्हणाल्या की, महिलांना भावाचा मोठा आधार वाटत असतो. जशी सख्खी नाती महत्वाची असतात, तशी मानलेली नाती सुद्धा आयुष्यात महत्त्वाची असतात. किरणभाऊ काळे हे आम्हा महिलांसाठी आमच्या अडीअडचणीच्या प्रसंगात भावाप्रमाणे आमच्या पाठीशी कायम उभे राहतात. आम्हाला आत्मविश्वास देतात. ते आमच्या पाठीशी असल्यामुळे समाजामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला कायम बळ मिळते.
यावेळी हिंदू – मुस्लिम एकतेचा देखील प्रसंग पहायला मिळाला. मुकुंद नगरच्या मोमीन सय्यद यांनी देखील हिंदू सण असणाऱ्या रक्षाबंधनचे औचित्य साधून किरण काळे यांना राखी बांधली. मोमीन सय्यद म्हणाल्या की, हिंदू बांधव मुस्लिमांच्या सणांमध्ये सहभागी होतात. तसेच मुस्लिम बांधव देखील हिंदू बांधवांच्या सणांमध्ये सहभागी होतात. माणुसकी हाच खरा धर्म असून एकमेकांच्या सणांचा आदर केल्याने एकमेकांविषयीचे प्रेम वाढत असते. मुस्लिम समाजातील भगिनींना देखील किरणभाऊ यांचे कायम मार्गदर्शन व सहकार्य मिळत असते.
यावेळी किरण काळे म्हणाले की, शहरातील युवती, महिला भगिनींनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून माझ्यावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे मी भारावून गेलो आहे. सामाजिक, राजकीय आयुष्यात काम करत असताना शहरातील युवती, महिलांकडून भाऊ या नात्याने एवढे प्रेम मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. शहरातील महिलांची सुरक्षितता आणि त्यांचे सक्षमीकरण ही मी माझी जबाबदारी समजतो. त्यासाठी मी कायम काम करीत आलो असून येथून पुढील काळात देखील शहरातील माझ्या भगिनींसाठी मी त्यांना सक्षम करण्याकरिता अधिकाधिक प्रयत्न करणार आहे.