दोन उड्डाणपुलांच्या मागणीकडे गडकरींनी कानाडोळा करत नगरकरांच्या तोंडाला पाने पुसली – किरण काळे उड्डाणपुलाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे कौतुक आणि यासाठी पाठपुरावा करणाऱ्या दिवंगत अनिलभैय्यांच्या नावाचा उल्लेख सुद्धा न होणे नगारकरांसाठी वेदनादायी, कॉग्रेसची टीका

अहमदनगर दि.१९ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांबाबत आणि खड्ड्यांच्या प्रश्नाबाबत ना. नितीन गडकरींनी ब्र सुद्धा काढला नाही. कल्याण रोडवरील नदीवरील पुलाची तातडीची गरज असताना त्याबाबत कोणतेही आश्वासन त्यांनी दिले नाही. न्यू आर्टस् कॉलेज ते सक्कर चौक उड्डाणपूल मागणी बाबतही त्यांनी नगरकरांना कोणताही दिलासा दिला नाही. नगरकरांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम गडकरींनी केले, अशी खंत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केली आहे.
काळे म्हणाले की, ज्या रस्त्यांनी गडकरी यांनी शहरातून प्रवास केला त्या ठिकाणी लगबगीने रस्त्यांची कामे, डागडुजी केली गेली. त्यांनी शहर खड्डे दर्शन यात्रा केली असती तर सामान्य नगरकरांच्या दैनंदिन आयुष्यातील दुःख त्यांना समजले असते. ते देशाचे रस्ते वाहतूक मंत्री आहेत. देशासह राज्यात देखील त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. ते स्वतःही नगर शहराच्या अंतर्गत रस्त्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करू शकले असते. तसेच राज्यातील त्यांच्या पक्षाच्या सरकारला देखील याबाबत सूचना करू शकले असते. मात्र त्यांनी यापैकी काही एक केले नाही.
शहराचे आमदार, दक्षिण नगरचे खासदार यांनी सुद्धा याबाबत कोणताही आग्रह धरला नाही. ज्यांनी उड्डाणपूलाच्या कामाला विरोध केला, त्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आमदारांचे कौतुक केंद्रीय मंत्री असणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी केले. मात्र नगरकरांमध्ये आजही लोकप्रीय असणाऱ्या आमच्या अनिलभैय्या राठोड यांच्या नावाचा साधा उल्लेख केला नाही. ही नगरकरांना वेदना देणारी बाब असल्याची खंत काळे यांनी व्यक्त केली आहे.