विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रभावीपणे नियोजन करावे:जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ

अहमदनगर दि. 22 डिसेंबर (प्रतिनिधी ):- जिल्ह्यातील तालुका व गावपातळीवर सुरू असलेली विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांनी प्रभावीपणे नियोजन करून संकल्प यात्रा यशस्वी करावी. असे मत जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी व्यक्त केले.
“विकसित भारत संकल्प यात्रा” जिल्ह्यात प्रभावीपणे यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, संबंधित विभागांचे विभाग प्रमुख, सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सालीमठ पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वकांक्षी उपक्रम जिल्ह्यांमध्ये तालुका, गावपातळीवरील लोकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळुन देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील सर्व घटकातील लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या उपक्रमात शासनाच्या योजनांच्या लाभांपासून जे लोक वंचित राहिले आहेत त्यांना लाभ मिळुन देण्यासाठी गावागावांत जनजागृती करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लोकांना लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीने शासकीय अधिकारी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी समन्वय ठेऊन ही संकल्प यात्रा यशस्वी करावी असे त्यांनी सांगितले. समाजातील गोरगरीबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे या उद्देशाने या यात्रेचा विकास रथ गावागावांध्ये जाऊन विविध योजनेचा प्रचार प्रसार करत आहे. गावांत ग्रामसेवक तलाठी यांनी यात्रा यशस्वी होण्याच्या दृष्टीने पुर्व प्रचार प्रसिध्दी करून जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. या कामात राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी आपआपल्या गावात गरजू लाभार्थ्यांपर्यंत हा लाभ पोहोचविण्यासाठी शासनास सहकार्य करावे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका स्तरावरील अधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीत तालुकास्तरावरील पदाधिका-यांनी संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी मौलिक सुचना मांडल्यात.