देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 6 डिसेंबर: कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालय हे पूर्वीचे अहमदनगर व आताचे अहिल्यानगर मधील एक जुने आणि महत्त्वाचे रुग्णालय आहे, जे प्रामुख्याने महिला आणि बाल आरोग्य सेवांसाठी ओळखले जाते, विशेषतः प्रसूतींसाठी या रुग्णालयाची एक खास ओळख आहे. हे रुग्णालय माळीवाडा भागात असून,ते अहिल्यानगर महापालिकेच्या अंतर्गत चालते.
या रुग्णालयात शहरातून व आजू बाजूच्या गावातून गोरगरीब रुग्ण येत असतात.
कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर, व कर्मचारी वर्गामुळे स्वछता, चांगल्या पद्धतीने राखली जाते, व रुग्णांना उत्तम सेवा देखील पुरविली जाते. पण या रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर व कामगार यांना गेल्या चार महिन्यापासून ठेकेदाराकडून पगार न दिल्यामुळे त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली असल्याची विदारक माहिती देशस्तंभ न्यूजच्या समोर आली आहे.
या रुग्णालयात डॉक्टर, लॅब टेक्निशियन, नर्स, परिचारिका, सफाई कामगार, शिपाई, असा मोठा कंत्राटी स्टाफ आहे. पाईपलाईनरोड, रेल्वे स्टेशन, मुकुंदनगर, बोल्हेगाव, नेप्तीनाका, केडगाव, भिंगार, कामरगाव आदी भागातून कामगार या रुग्णालयात कामाला येतात. प्रत्येकाच्या घरची परिस्थिती नाजूक असल्याने ते काम करतात. गेल्या चार महिन्यापासून त्यांना पगार दिला जात नाही. यापूर्वी पगार वेळेवर होत नसल्यामुळे अनेक कामगार निराशेपोटी काम सोडून गेले. आज या रुग्णालयातील कामगारांची अक्षरशः उपासमार होते हे विदारक वास्तव आहे.
सद्गुरु इंडस्ट्रीज या संस्थेने कंत्राटी कामगारांचा ठेका घेतलेला आहे. पगाराच्या बाबत कामगारांनी सद्गुरु इंडस्ट्रीजचे ठेकेदार यांना पगार करा. अशी विनवणी केल्यावर ‘आमच्याकडे पैसे नाहीत, तुम्हाला काम करायची तर करा नाही, तर सोडून जा’!अशा पद्धतीची उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. याबाबत कामगारांनी महानगरपालिकेचे आयुक्त डांगे यांची भेट घेऊन ही बाब सांगितली. याबाबतीत आयुक्त डांगे यांनी संबंधित ठेकेदाराला कामगारांचे पगार देऊन टाका असे सांगून देखील आजपर्यंत कामगारांना त्यांचा पगार मिळाला नाही. हे आर्थिक शोषण कुठपर्यंत चालणार? याबाबत कामगारांच्या मनामध्ये संताप आणि निराशेची भावना आहे. चार महिन्यापासून पगार तर नाहीतच पण दरवर्षी जी पगारवाढ दिली जाते ती सुद्धा कामगारांच्या पदरी नाही. यामुळे ‘ठेकेदार तुपाशी आणि कामगार उपाशी’ अशा संतापजनक भावना कंत्राटी कामगारांमधून होत आहेत.
एकंदरीतच गोर गरीब कंत्राटी कामगारांना त्यांनी केलेल्या परिश्रमाचा त्यांच्या हक्काचा पगार मिळणार आहे की नाही? त्यांचे आर्थिक शोषण थांबणार आहे की नाही? याबाबत कामगारांचे आणि शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा