हुंडेकरी – मुकादमांमधील करारनामा ग्राह्य न धरण्याचे कामगार आयुक्तांचे आदेश ; रेल्वे मालधक्का माथाडी कामगार शिष्टमंडळाने मुंबईत आयुक्तांची घेतली भेट

मुंबई दि.28 एप्रिल (प्रतिनिधी) : रेल्वे मालक्यावरील कामगारांचा वेतन वाढ, वारईसाठी लढा सुरू आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कामगार आयुक्त सतीश देशमुख यांची मुंबईच्या बीकेसी संकुलातील कामगार भवनात समक्ष भेट घेतली. यावेळी सुमारे पाऊन तास चर्चा झाली. या चर्चेअंती आयुक्तांनी हुंडेकरी – मुकादमांमधील करारनामा ग्राह्य न धरण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांना दिले.
मंगळवारी कवले व मंडळाचे सचिव तुषार बोरसे यांनी आंदोलनकर्त्या कामगारांना डावलून आंदोलनाशी संबंध नसणाऱ्या मुकदमांना बेकायदेशीररित्या बैठकीसाठी बोलविल्याचा आरोप करत कामगारांनी काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौकशीची मागणी करत मुंडन आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर माथाडी मंडळ अध्यक्ष, सचिव यांच्या कडून कामगारांवर संगममताने सुरू असणाऱ्या अन्यायाचा पाढाच कामगारांनी आयुक्तांसमोर वाचला. याची तात्काळ दखल घेत आयुक्तांनी इथून पुढे मुकादमां ऐवजी वेतन वाढ मागणी करणाऱ्या कामगारांना बैठकांसाठी बोलवण्याच्या सूचना कवले यांना दिल्या.
अधिक माहिती देताना काळे म्हणाले की, कोरोना कालावधीनंतर कामगारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांच्यावर कर्ज आहेत. मुलांची शिक्षण, लग्न, घरातील वयोवृद्धांच्या आरोग्याचा खर्च अशा अनेक आर्थिक ताणतणावांतून कामगारांना जावे लागत आहे. प्रत्येक कामगाराला सुमारे दोन ते तीन लाख रुपये अदा होणे बाकी आहे. त्यामुळे लवकरात लवकर वसुली होणे आवश्यक आहे. कामगारांना त्यांच्या घामाचा फरक मिळवून देण्यासाठी माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काँग्रेसने आपली ताकद कष्टकरी कामगारांच्या पाठीशी उभी केली आहे.
काळे यांनी दावा केला आहे की, वसुली झाली असल्याची खोटी माहिती काही प्रसार माध्यमांना कवले यांनी दिली होती. आयुक्तांनी याबाबत कवले यांची चांगलीच कान उघडणी केली असून मंडळाच्याच वेतन वाढ आदेशाची अंमलबजावणी होण्यास दोन वर्षांपासून दिरंगाई झाली असल्याबद्दल खडे बोल सुनावले आहेत. हुंडेकरी यांनी मुकदमांना हाताशी धरून संगनमत करत कामगारांना अंधारात ठेवून वेतन वाढ न करण्याचा बेकायदेशीर करारनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र आयुक्तांच्या आदेशामुळे असा कोणताही करारनामा सादर केल्यास तो ग्राह्य न धरण्याचा आयुक्तांनी आदेश दिल्याचे कामगारांना समजतातच नगर मधील माल धक्क्यावरील कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.
कामगार प्रतिनिधी विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे यांनी सांगितले की, कामगार आयुक्त यांनी मागण्यांची गंभीर दखल घेत यशस्वी शिष्टाई करुन कामगार हिताचे आदेश दिल्यामुळे आठ दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणारे अर्ध नग्न बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. यावेळी शिष्टमंडळामध्ये कामगारांच्यावतीने किशोर ढवळे, सुनील नरसाळे, विजय कार्ले, जयराम आखाडे आदी सहभागी झाले होते.