ध्येय निश्चित करुनच घडवू शकतो आपण आपले भवितव्य : स.पो.नि. पल्लवी देशमुख स्नेहबंध फौंडेशन व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन तर्फे करिअर मार्गदर्शन

अहमदनगर (प्रतिनिधी) : करिअरसाठी एक निश्चित ध्येय असावे. परंतू ध्येय निश्चित करुनच आपण आपले भवितव्य घडवू शकते, असे प्रतिपादन भरोसा सेल पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पल्लवी देशमुख यांनी केले.
स्नेहबंध सोशल फौंडेशन व भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन यांच्यावतीने भिंगार येथील श्रीमती मायादेवी ॲबट गुरुदीत्ताशाह हायस्कूलमध्ये आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, स्नेहबंध फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उद्धव शिंदे, प्राचार्य व्ही. एल. नरवडे, व्ही.आर. साठे, ए. एस. पडदुणे उपस्थित होते.
देशमुख म्हणाल्या, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास घरीच राहून केला. जोपर्यंत मनात जिद्द येत नाही. तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. विद्यार्थिंनींनी स्वसंरक्षणासाठी मिरची पावडर सोबत ठेवावी, टवाळखोर मुले त्रास देत असतील ११२ ला कॉल करावा, निर्भया पथकाची गाडी काही वेळेतच येते.
- सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख म्हणाले, अधिकारी बनणे सोपे नसते. त्यासाठी आपली मानसिकता व जिद्द असावी लागते. दहावी हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो. दहावी नंतर योग्य शाखा घ्यावी. १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलिस होण्यासाठी पात्र होऊ शकतात. पदवीनंतर स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस अधिकारी होऊ शकता, असेही देशमुख म्हणाले. प्रास्ताविक प्राचार्य व्ही.एल. नरवडे यांनी केले. सूत्रसंचालन जी. एम. करवते यांनी, तर आभार एस. एम. आस्वर यांनी मानले.