दिव्यांगांच्या कलागुणांनी संगमनेरकर भारावले दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

*अहमदनगर, २३ डिसेंबर – संगमनेर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव पार पडला. जिल्ह्यातील २५ दिव्यांग शाळांतील ६५० मुला-मुलींनी स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवात सहभाग घेतला. दिव्यांगाचा स्पर्धांमधील उत्स्फूर्त सहभाग व सांस्कृतिक महोत्सवामध्ये त्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी संगमनेरकर भारावून गेले.
जिल्हा परिषद जिल्हा समाजकल्याण अधिकारी, संग्राम निवासी मुकबधिर विद्यालय आणि संगमनेरच्या डॉ. देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. जागतिक दिव्यांग दिन ३ डिसेंबरचे औचित्य साधून या स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन २१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी संगमनेर महाविद्यालयात झाले. सायंकाळी ७ वाजता कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहात झालेल्या सांस्कृतिक महोत्सवात दिव्यांगांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. २२ डिसेंबर २०२२ रोजी स्पर्धेच्या निमित्ताने संगमनेर शहरात दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. संगमनेरकरांनी रांगोळ्या काढून व खाऊ वाटप करून रॅलीचे स्वागत केले.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकून क्रीडा स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. बक्षिस वितरण सत्यजित तांबे यांच्या हस्ते पार पडले. अंध, मतिमंद, मूकबधिर व अस्थी व्यंग प्रवर्गाच्या ६५० विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवात सहभाग घेतला.
सहाय्यक सल्लागार दिनकर नाठे, सहाय्यक लेखाधिकारी श्री.गांगुर्डे, श्री. चव्हाण, शिक्षक नेते हिरालाल पगडाल, संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, संग्राम संस्थेचे सेक्रेटरी डॉ. नामदेव गुंजाळ, उपाध्यक्ष सूर्यकांत शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
संगमनेर येथील सिद्धकला महाविद्यालयाचे १० वैद्यकीय अधिकारी रूग्णवाहिकेसह उपस्थित होते. घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे पथक, संगमनेर येथील १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका व त्यांचे पथक यांनीही सेवा बजावली.