मंगल कार्यालय चोरीनंतर आता रस्ताही गेला चोरीला! काँग्रेस उपाध्यक्ष अशोक शिंदेंची जिल्हा पोलीस अधीक्षकांसह आयुक्तांकडे तक्रार

अहमदनगर दि.०९ डिसेंबर (प्रतिनिधी) : प्रियदर्शन कॉलनी, पोलीस कॉलनी परिसर, वैभव कॉलनी या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या निधीतून करण्यात आलेले रस्ते चोरीला गेल्या बाबत व संबंधित रस्ते शोधून देणे बाबत काँग्रेस उपाध्यक्ष अशोक दशरथ शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच तयार केलेले रस्ते डांबरासह पूर्णपणे गायब झाले असून ते चोरीला गेले असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिंदे यांनी म्हटले आहे की, वर नमूद परिसरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने खडीकरण, डांबरीकरणचे काम करत जनतेच्या पैशांतून रस्ते करण्यात आले होते. यासाठी लाखो रुपये जनतेच्या पैशातून खर्च करण्यात आलेले आहेत. सदर कामे होऊन काहीच महिने झाले आहेत. मात्र आज रोजी सदर भागाची पाहणी केली असता सदर परिसरातील डांबरी रस्ते गायब झाले असून ते चोरीला गेले आहेत. कारण काहीच महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्चून केलेले रस्ते असे जर दिवसाढवळ्या गायब होत चोरीला जात असतील तर पोलीस प्रशासनाने याची दखल घेण्याची आवश्यकता आहे.
त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने व नागरिकांच्या वतीने आमची मागणी आहे की, सदर चोरीला गेलेले डांबरी रस्ते पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तात्काळ आम्हाला शोधून द्यावेत. डांबरी रस्ता चोरीला गेल्यामुळे आणि आता फक्त केवळ खडी उरलेली असल्यामुळे यावरून वाहने घसरत असून रोज अपघात होत आहेत. यामध्ये आजवर अनेक लोक जखमी झाले आहेत. रस्त्यासाठीचे लाखो रुपये हे सर्वसामान्य नगरकर यांच्या खिशातून खर्च झालेले आहेत.
शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, यापूर्वी वैदुवाडी परिसरातील मंगल कार्यालय देखील चोरीला गेले असून त्याबाबत देखील आपल्याकडे मनपाच्या वतीने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे पत्र आयुक्त, मनपा, अहमदनगर यांनी दिले आहे. त्याबाबत देखील तात्काळ कारवाई करून संबंधित गुन्हेगारांवर नावानिशी गुन्हे दाखल करत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
महानगरपालिकेची तथा शासनाची वास्तू जनतेचे आणि शासनाचे नुकसान होईल अशा पद्धतीने पाडून शासकीय पैशातून खरेदी केलेल्या सामानाची चोरी केल्याच्या अपहाराबाबत आणि केलेल्या चोरीच्या कृत्याबाबत संबंधितांवर गंभीर गुन्हे दाखल करत तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने व नगरकर नागरिकांच्या वतीने मागणी करत आहोत.
शिंदेंच्या तक्रारीच्या धसक्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात :
दरम्यान, वीस दिवसांपूर्वी माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह मनपा अभियंता मनोज पारखे यांच्याशी समक्ष चर्चा केली होती तसेच शहर अभियंता सुरेश इथापे यांच्याकडे देखील रस्ता चोरीला गेल्या बाबत तक्रार केली होती. या दणक्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून आज सकाळपासूनच पुन्हा एकदा या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सोनाबाई तायगा शिंदे यांचा मुलगा सतीश शिंदे हा या कामासाठी ठेकेदार असल्याचं नागरीकांना सांगत असून त्याने निकृष्ट काम केले आहे, असा आरोप अशोक शिंदे यांनी केला असून याबाबत मनपाकडे लेखी तक्रार केली असून काँग्रेसने घेतलेला भूमिकेमुळेच मनपा आता पुन्हा कामाला लागल्याचा दावा शिंदेंनी केला आहे.