राष्ट्रवादी – भाजप म्हणजे दुतोंडी मांडूळं – किरण काळे

▶️ *…अन्यथा महाघोटाळ्याला पाठिंबा देणाऱ्या भ्रष्टाचारी नगरसेवकांच्या दारात काँग्रेसचा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा,*
▶️ *काँग्रेस नगरसेवकांना तात्काळ विरोधाची लेखी पत्र देण्याचा काळेंचा पक्षादेश, विरोध न करणाऱ्यांना उमेदवारी न देण्याची घोषणा*
————————————–
अहमदनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीनेच स्मशानभूमीसाठी रू. ३२ कोटींचा नवीन जागा खरेदीचा प्रस्ताव महासभेसमोर आणण्यासाठी षड्यंत्र रचले. त्यासाठी भाजप नगरसेवकाची जागा चढ्या भावाला निश्चित केली. यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. नगरकरांच्या तिजोरीवर दरोडा घालणाऱ्यांवर काँग्रेसने ‘३२ खोके, एकदम ओके’ म्हणत हल्लाबोल केला. म्हणूनच आता राष्ट्रवादीच्या आमदारांनी जमीन खरेदीसाठी आपण सहमत नसल्याची भूमिका घेतली आहे. भाजपने देखील हा विषय मनपाचा आहे, असं म्हणत हात झटकले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी – भाजप म्हणजे दुतोंडी मांडूळं आहेत, अशी बोचरी टीका शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
काँग्रेसने हल्लाबोल केल्यानंतर आणि अनेक नगरसेवकांचा देखील विरोध सुरू झाल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्या आहेत. आमदारांनी नवीन जागा खरेदी ऐवजी जुनीच जागा यासाठी निश्चित करावी अशी भूमिका घेतली आहे. तर स्वतः नगरसेवक असणाऱ्या भाजप शहराध्यक्षांनी हा विषय केवळ मनपाचा आहे, असे म्हणत गोलमाल भूमिका व्यक्त केली आहे. काँग्रेसने याला “दुतोंडी मांडूळं” म्हणत याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.
काळे म्हणाले की, “सब मिल बाट के खाव” अशा पद्धतीने सध्याची महापालिका चालवली जात आहे. मांजर दूध पीत आहे, तिला कोणी पाहत नाही. असा अनेकांचा गैरसमज आहे. पण शहरातील लाखो नगरकर या भ्रष्टाचारी बोक्यांना पाहत आहेत. महापालिकेत विरोधी पक्ष उरलेला नसला तरी सभागृहाबाहेर मात्र नागरिकांच्या हिताचे रक्षण करणारा काँग्रेस पक्ष हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून नागरिकांच्या वतीने शहराच्या हिताची भूमिका घेण्यासाठी शतप्रतिशत सक्षम आहे. त्यामुळेच मनपाच्या तिजोरीवर दरोडा घालणाऱ्यांच्या आता दुतोंडी भूमिका समोर येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी, भाजप नेत्यांनी आता घेतलेल्या परस्परविरोधी आणि गोलमाल भूमिका यामुळे ३२ कोटीच्या महागोटाळ्याचा डाव निम्मा हाणून पाडण्यात जनतेच्या वतीने काँग्रेस यशस्वी झाली असल्याचा दावा काळे यांनी केला आहे.
▶️ *१५ दिवसांच्या आत महासभा पाचारण करा :*
दरम्यान, काळे यांनी काँग्रेसच्या वतीन महापालिकेला १५ दिवसांच्या आत या ठरावावर पुनर्विचार करण्यासाठी विशेष महासभा पाचारण करण्याची लेखी मागणी केली आहे. यावेळी १०० टक्के नगरसेवकांनी उपस्थित राहत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे जाहीर आवाहन काँग्रेसने सर्व पक्षीय नगरसेवकांना केले आहे.
▶️ *”त्या” सर्वपक्षीय नगरसेवकांच्या दारात अन्यथा काँग्रेसचे बोंबाबोंब आंदोलन :*
३२ कोटीच्या जमीन महाघोटाळाच्या ठरावाचा पुनर्विचार करण्यासाठीच्या विशेष महासभेत जनतेचे हित लक्षात न घेता जे नगरसेवक या घोटाळ्याला आता पाठिंबा देतील अशा नगरसेवकांच्या दारात काँग्रेस कार्यकर्ते शहरभर प्रत्येक प्रभागात जात बोंबा मारण्याचे बोंबाबोंब आंदोलन करतील. नगरसेवकांनी केलेल्या घोटाळ्याची पत्रक प्रभागात नागरिकांना वाटतील, असा आक्रमक इशारा काँग्रेसने पत्रकार परिषदेत दिला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे नगरसेवकांचे धाबे चांगले दणाणले आहेत.
▶️ *काळेंचा काँग्रेस नगरसेवकांना पक्षादेश, …अन्यथा उमेदवारी न देण्याचा घोषणा :*
शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस चिन्हावर नगरसेवक असणाऱ्या रूपाली निखिल वारे, संध्या बाळासाहेब पवार, सुप्रिया धनंजय जाधव, रिजवाना फारूक शेख या नगरसेवकांना आपण तात्काळ या महाघोटाळ्याला काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरील नगरसेवक या नात्याने आपला स्पष्ट विरोध असल्याचे लेखी पत्र आयुक्तांना २ दिवसांच्या आत सादर करावे, असा लेखी पक्षाआदेशच काढला आहे. तसेच प्रत्येकाला फोनद्वारे तशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. काँग्रेस नगरसेविका शीला दीप चव्हाण, आसिफ सुलतान यांनी यापूर्वीच विरोधाची लेखी पत्र आयुक्तांना दिली आहेत. सर्व नगरसेवकांनी विरोधाची पत्र देण्यासाठी अनुकूलता दाखवल्याचे काळे यांनी सांगितले असून काँग्रेसचे जे नगरसेवक याला लेखी विरोध करणार नाहीत त्यांना एक वर्षावर येऊ घातलेल्या मनपा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी कोणत्याही परिस्थितीत दिली जाणार नाही असे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. पक्षादेशाची प्रत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांना देखील पाठवण्यात आली आहे.
▶️ *नाहीतर काँग्रेस नगरसेवकांच्या दारातच पहिले बोंबाबोंब आंदोलन :*
सर्वपक्षीय नगरसेवकांना या घोटाळ्याला विरोध करण्याचे आवाहन करत असताना काँग्रेसच्या जर कोणत्याही नगरसेवकांनी यास लेखी विरोधाचे पत्र दिले नाही तर अशा काँग्रेस नगरसेवकांच्या दारातूनच काँग्रेस कार्यकर्ते सगळ्यात आधी बोंबाबोंब आंदोलनाची सुरुवात करून त्यानंतर विरोध न करणाऱ्या अन्य पक्षांच्या नगरसेवकांच्या दारात आंदोलनाला जातील, अशी अत्यंत परखड भूमिका काळेंनी काँग्रेसच्या वतीने जाहीर केली आहे. जनतेने त्यांच्या हिताच्या रक्षणासाठी नगरसेवकांना निवडून दिले आहे. चोऱ्या-माऱ्या करण्यासाठी नाही. त्यामुळे या महाघोटाळ्यास जर कोणत्याही काँग्रेस नगरसेवकांनी विरोध केला नाही तर त्यांना सुद्धा पक्षाच्यावतीने माफी दिली जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका काळे यांनी घेतली आहे.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, शहर जिल्हा महासचिव इमरान बागवान, जिल्हा सचिव शंकर आव्हाड, इंजि. सुजित क्षेत्रे, प्रशांत जाधव, युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण गीते पाटील, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, गणेशभाऊ चव्हाण आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
.