राजकिय

नगर शहर काँग्रेस राबविणार “डरो मत” अभियान दहशती विरोधात व विकासासाठी नगरकरांचे जनआंदोलन उभे करणार – किरण काळे

अहमदनगर दि. २४ जुलै (प्रतिनिधी) : शहरातील एकामागे एक सुरु असणारी हत्याकांडं, खुनी हल्ले, मारामाऱ्या, बेकायदेशीररित्या ताबे मारण्याचे प्रकार या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी, आ.बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या संकल्पनेतून “डरो मत” अभियानाची घोषणा ‘शिवनेरी’ पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. २४ तास ३६५ दिवस नगरकरांसाठी काळे यांचा ८६९८७५७०६३ हा वैयक्तिक मोबाईल क्रमांक डरो मत अभियानाचा हेल्पलाईन क्रमांक म्हणून जाहीर करण्यात आला असून अन्यायग्रस्त, पीडितांना तसेच परिसरातील नागरी समस्यांसाठी मदतीकरीता थेट संपर्क साधण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे.
अभियाना विषयी माहिती देताना किरण काळे म्हणाले की, दहशती विरोधात व विकासासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दहशतीच्या वातावरणामुळे त्यांचे खचलेले मनोबल उंचविण्यासाठी धीर देणार आहेत. त्यांना भेडसावणारे नागरी प्रश्न जाणून घेत त्याच्या सोडवणुकीसाठी मनपा, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहेत. मी स्वतः या अभियानाच्या माध्यमातून व्यापारी, उद्योजक, कष्टकरी, शिक्षक, डॉक्टर, वकील तसेच हिंदू, मुस्लिमांसह सर्व धर्मीय बांधवांशी, युवा वर्गाशी संवाद साधत दहशतमुक्त विकसित नगरसाठी लोकसहभागातून नगरकरांचे जनआंदोलन उभे करण्यासाठी संवाद साधणार आहे.
शुक्रवारी रात्री दैव बलवत्तर म्हणून तिसरे हत्याकांड घडले नाही, असा दावा यावेळी ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांनी पत्रकार परिषदेत केला. झिंजे म्हणाले यापूर्वी शहर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हल्ला करणाऱ्या टोळीने पुन्हा एकदा आमच्या चितळे रोडवरील व्यवसायाच्या ठिकाणी येत गोळ्या घालून आज त्याचा गामा भागानगरे करायचा आहे असे म्हणत रस्त्यावर दहशत केली. गिर्‍हाईकांना दमबाजी केली. हा काँग्रेसचा नगरसेवक आहे. हा आमचे अवैध धंदे बंद करतो. याचा धंदा बंद करा, असे म्हणत धुडगूस घातला. हे सर्व सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाले असून गुन्हा दाखल झाला आहे. मी नेहमीप्रमाणे जर त्या दिवशी हॉटेलवर उपस्थित असतो तर माझी हत्या झाली असती, असा गंभीर दावा झिंजे यांनी यावेळी केला.
काळे म्हणाले, जिल्हा पोलीस अधीक्षकांची व्यापाऱ्यांसमवेत भेट घेऊन या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी तात्काळ दोन स्टेनगनधारी पोलीस संरक्षणासाठी उपलब्ध करून दिले. झिंजेंना संरक्षण मिळाले. पण आज शहरातील नागरिक, व्यापारी, उद्योजक, कष्टकरी सर्वच भयभीत, असुरक्षित आहेत. पोलीस आपल्या लाखो नगरकरांना स्टेनगनधारी संरक्षण देऊ शकणार आहेत का ? लाखो नगरकरांच्या सुरक्षेच काय ? असा सवाल यावेळी काळे यांनी उपस्थित केला. काँग्रेसचे पोलीस प्रशासनाला कायम सहकार्य आहे. नागरिकांनी देखील सतर्क राहत कुठे ही अनुचित प्रकार घडत असल्यास तात्काळ पोलिसांशी ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी काळेंनी केले.
शहरातल्या नागरी प्रश्नांच्या दुरावस्थेबाबत, भ्रष्टाचार, घोटाळे, दहशती विरोधात काँग्रेस लढत आहे. त्यामुळे इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शहराचे आमदार मला तडीपार करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत प्रशासनावर दबाव आणत आहेत. राहुल गांधींना स्पर्धेतून बाद करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग सुरू असून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. तीच कूटनीती ते शहरात वापरत आहेत. हिम्मत असेल तर स्वतः समोर येऊन लढा. दुःखात असणाऱ्या स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचा खांदा का वापरता ? असे आव्हान देत काळे म्हणाले की, मी संविधान, लोकशाहीला मानणारा आहे. नागरिकांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन, मोर्चे, उपोषण, निदर्शने करणे हा जर गुन्हा असेल, तर तो गुन्हा मी रोज करायला तयार आहेत. त्यासाठी जर मला तडीपार केले तर मी जिल्ह्याच्या सीमेवरून नागरिकांच्या प्रश्नांवर रोज आंदोलन करेल. झूम वरून पत्रकार परिषदा घेईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरकरांच्या प्रश्नांना वाचा फोडत राहील. पण थांबणार नाही. घाबरणार नाही.
माझा नगरकरांवर पूर्ण विश्वास आहे. योग्य वेळेला ते योग्य निर्णय घेतील. काँग्रेस त्यांच्यासाठी उभे करत असलेल्या जनआंदोलनात शहरातील राजकीय दूषित वातावरणामुळे सर्व नगरकर जाहिररित्या जरी सहभागी होऊ शकले नाही तरी भूमिगतरित्या ते मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास किरण काळेंनी यावेळी व्यक्त केला. यावेळी संजय झिंजे, दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, मनसुख संचेती, आकाश आल्हाट, गंगाधर जवंजाळ, गौरव घोरपडे, सोफियान रंगरेज आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे