नगर शहर काँग्रेसच्या “त्या” फलकामुळे राजकीय चर्चेला उधाण!

अहमदनगर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नगर शहरात माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मेळाव्यातून शहर काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या निमित्ताने शहरामध्ये आजी – माजी महसूल मंत्र्यांच्या समर्थकांमध्ये फ्लेक्सवॉर पाहायला मिळाले. ते थंड होते ना होते तोच नगर शहर काँग्रेसच्या चितळे रोड येथे लागलेल्या फलकामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
राजकीयदृष्ट्या कायम चर्चेत असणाऱ्या चितळे रोडवर नगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने *”नगरकरांच्या सेवेसाठी, लवकरच…”* एवढाच मजकूर लिहिलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. या फ्लेक्सवर काँग्रेसचे पक्ष चिन्ह असून अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी असा उल्लेख केलेला आहे. केवळ “लवकरच…” असे लिहिलेल्या या फलकातून काँग्रेसला नगरकरांना नेमका काय संदेश द्यायचा आहे, हे स्पष्ट होत नसले तरी काँग्रेस लवकरच नेमके काय करणार आहे याबाबत मात्र वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.
या फलकाबाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष *किरण काळे* यांना विचारले असता, हा फलक पक्षाच्या वतीने लावण्यात आला असल्याबाबत त्यांनी सांगितले आहे. मात्र यातून काँग्रेसला काय म्हणायचे आहे असे विचारले असतात काळे यांनी देखील *”लवकरच समजेल..”* एवढीच अल्प प्रतिक्रिया देत अधिक भाष्य करणे टाळले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लवकरच काँग्रेस शहरामध्ये काही महत्त्वाची घोषणा करणार आहे की काय अशी कुजबुज नगरकरांमध्ये रंगू लागली आहे. नगर शहर काँग्रेसच्या “त्या” फलकामुळे माञ राजकीय चर्चेला शहरात चांगलेच उधाण आले आहे.