राजकिय

माझा खून झाला तरी चालेल पण दहशतीच्या विरोधात नगरकरांसाठी आवाज उठवत राहणार – किरण काळे नार्को टेस्टची मागणी, हत्याकांडातील आरोपीशी संबंध जोडल्या बद्दल काळेंनी सोमवंशीवर दाखल केला बदनामीचा गुन्हा

अहमदनगर दि. २३ जुलै (प्रतिनिधी) : सावेडी हत्याकांड, भागानगरे हत्याकांड या विरोधात काँग्रेस शहरामध्ये नगरकरांचा आवाज बनत निर्भीडपणे आवाज उठवत आहे. अवैध धंदे, दहशत, गॅंगवॉर रोखण्यासाठी विधानसभेपर्यंत नगर शहराच्या दहशतीला काँग्रेसने वाचा फोडली आहे. याच्यामुळेच शहरामध्ये ताबा गॅंग चालवणारे, “जे” गॅंगचा पोटशूळ उठला आहे. म्हणूनच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अंकुश चत्तर याच्या हत्याकांडातील आरोपीशी माझा यतकिंचितही संबंध नसतानाही तो जोडून माझी सामाजिक, राजकीय प्रतिमा मलिन करत बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे. या सगळ्याचा बोलविता धनी कोण आहे हे नगरकरांना माहीत असल्याचा पलटवार शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. माझा खून झाला तरी चालेल. पण दहशतीच्या विरोधात आणि शहर विकासासाठी मी नगरकरांकरिता आवाज उठवतच राहणार असल्याचे यावेळी काळे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस कार्यालय शिवनेरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनोज गुंदेचा, संजय झिंजे, दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, अलतमश जरिवाला, आकाश आल्हाट, गंगाधर जवंजाळ, सोफियान रंगरेज, गौरव घोरपडे, विकास भिंगारदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, काळे यांनी स्वतःची, हत्याकांडातील मुख्य आरोपीची आणि त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी जाहीर मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. पत्रकार परिषदेपूर्वी काळे यांनी काँग्रेस शिष्टमंडळासह पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांचेही लक्ष वेधले आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे हेही उपस्थित होते.
काळे म्हणाले की, चत्तर कुटुंबीयांच्या दुःखा बाबत यापूर्वीच काँग्रेसने हळहळ व्यक्त केली आहे. कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे याबाबत शासन दरबारी देखील जाहीररित्या मागणी केली आहे. त्याचवेळी चत्तर याच्यावर पोलीस दप्तरी दाखल असणारे गुन्हे ही वस्तुस्थिती असून ती कोणीही बदलू शकत नाही. त्यामध्ये १६ गुन्ह्यांसह विविध ७४ कलमां अन्वये मागील १६ वर्षांमध्ये ४ हाफ मर्डर सह ताबा मारणे, मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादीच्या शहरातील बड्या नेत्याने जर त्याच्या तडीपरीच्या प्रस्तावात राजकीय दबाव आणला नसता तर आज चत्तर वाचला असता ही भूमिका यापूर्वीच काँग्रेसने मांडलेली आहे.

काळे पुढे म्हणाले, आरोपी भाजप नगरसेवक याला कठोर शासन करण्यात यावे यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून विधानसभेत मी प्रश्न उपस्थित केला आहे. गृहमंत्र्यांनी देखील जात, धर्म, पक्ष न पाहता कारवाई करण्यात येईल असे सभागृहात सांगितले आहे. शहर काँग्रेसने शहर भाजपला मुख्य आरोपीच्या हकालपट्टीच्या कारवाईसाठी ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. असे असताना मी मुख्य आरोपीला मदत होईल अशा पद्धतीने वक्तव्य करत असल्याचा माझ्यावर करण्यात आलेला आरोप हास्यास्पद असून याचा बोलविता धनी हा शहरातील मोठा सत्ताधारी राजकीय नेता आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे अशा पद्धतीची कृत्य राजकीय षड्यंत्र रचत केली जात आहेत.
सोमवारी दुपारी सावेडी उपनगरातील दुकानदार, व्यापाऱ्यांवर दहशत केली गेली. ही वस्तुस्थिती आहे. मात्र चत्तर याच्या निर्घृण, अंगावर काटा आणणाऱ्या हत्येमुळे सर्वसामान्य व्यापारी तक्रार देण्यासाठी पुढे का येतील ? ते आले तर पोलिसा त्यांना संरक्षण देण्यासाठी सक्षम आहेत का ? त्यामुळे केवळ बघ्याची भूमिका न घेता पोलिसांनी स्वतः कारवाई करायला पाहिजे होती. माझ्यावर आरोप करताना खुनातील आरोपी कसे चांगले आहेत असे मी भासवत असल्याचे म्हटले आहे. शहरामध्ये काँग्रेस एकमेव पक्ष आहे की ज्याने या संदर्भामध्ये अत्यंत कठोर भूमिका घेत शहरामध्ये शांतता, व्यापार, उद्योग, रोजगार हे आम्हाला हवे असून आम्हाला गुंडाराज नको आहे अशी भूमिका घेतली आहे.
माझे ज्येष्ठ बंधू हे वकील आहेत. तो त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायात त्यांनी काय करावे काय करू नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून मी कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात आणि व्यवसायात कधीही लक्ष देत नाही. मात्र अजून उज्वल निकमांची नियुक्ती आणि मोक्काची कारवाईची शहराच्या आमदारांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली मागणी ही निश्चितच दिशाभूल करणारी आहे. या मतावर आजही काँग्रेस ठाम आहे. शेवटी निर्णय शासनाने आणि पोलीस प्रशासनाने घ्यायचा आहे. माझ्या बंधूंनी आरोपीचे वकीलपत्र घेतलेले नाही. तेथे घेणार देखील नाहीत. असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. असे असतानाही केवळ शहरातल्या गुंडगिरीच्या विरोधात नागरिकांच्या हितासाठी गरजणारा काँग्रेसचा निर्भीड आवाज दाबण्यासाठी माझ्यावर शिंतोडे उडवून बदनामी केली जात आहे. मात्र अशा गोष्टींना मी भीक घालत नाही. नगरकरांचे हित, शहराला दहशतमुक्त करणं आणि शहराचा विकास करणे हे आपलं ध्येय असून वाटेत कितीही काटे आले तरी ते पार करत नगरच्या हितासाठीची लढाई कायम चालू राहील, असा सज्जड इशारा काळे यांनी त्यांच्या विरोधकांना यावेळी बोलताना दिला आहे.
दरम्यान संध्याकाळी तोफखाना पोलीस स्टेशन येथे किरण काळे यांच्या फिर्यादीवरून, “किरण काळे व आरोपी स्वप्निल शिंदे व त्यांचे बंधू सचिन शिंदे यांच्याशी किरण काळे यांची खूप जवळीक असून त्यांचे जमीबाबत आर्थिक व्यवहार होत होते” असे म्हणत काळे यांचा कोणताही संबंध आरोपीशी नसताना देखील संबंध जोडून बदनामी केल्याप्रकरणी भादवि ५०० प्रमाणे बाळासाहेब भानुदास सोमवंशी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. यातील सत्य समाजा समोर आणण्यासाठी नार्को टेस्टची काळेंनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे