महापालिका वृक्ष प्राधिकरणचा निर्णय. नगरमध्ये बेकायदा वृक्ष तोड केल्यास होणार ५० हजार रु.दंड

अहमदनगर: दि.२० जून (प्रतिनिधी)- महानगरपालिकेची वृक्ष प्राधिकरण सभा आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष शंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली असुन राज्य सरकारच्या आदेशानुसार सुधारीत वृक्ष कायद्याची नगर शहरात अंमलबजावणी करण्याबाबत बैठकीस उपस्थित सदस्यामध्ये विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा होवुन या पुढे बेकायदा वृक्ष तोड केल्यास प्रती वृक्षासाठी रु.५० हजार दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम,१९७५ या कायद्यात सुधारणा करुन अंमलबजावणी करण्यात यावी असे परिपत्रक काढुन महापालिकेस आदेश दिले होते.तसेच या सुधारीत कायद्याची अंमलबजावणी अहमदनगर महापालिका कार्यक्षेत्रात करण्यात यावी व बेकायदा वृक्षतोड केल्यास संबधितावर प्रती वृक्ष ६० हजार दंड आकारावा अशी मागणी उपमहापौर गणेश भोसले आणि येथिल “हरियाली” संस्थेच्या वतीने महापालिकेकडे संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी केली होती.
या सुधारणा परिपत्रकातील १३ क्रमांकाच्या मुद्द्यानुसार बेकायदा वृक्ष तोड केल्यास जास्तीत जास्त रु.१ लाख पर्यंत मर्यादित दंड राहील.असे म्हटले असुन या मुद्द्यावर सदस्यामध्ये प्रदिर्घ चर्चा होवुन अहमदनगर शहरात या पुढे बेकायदा वृक्षतोड झाल्यास ७ वर्ष वयाच्या पुढील प्रती वृक्षासाठी ५० हजार रुपए दंड संबधिताकडुन आकरण्यात यावा.तसेच या सुधारीत कायद्यानुसार ५० वर्ष किंवा त्याहुन अधिक वयाचे “हेरिटेज ट्री” (प्राचीन वृक्ष) तोडावयाची परवाणगी देण्यात येणार नाही तथापी अपवादात्मक परिस्थितीनुसार वृक्ष प्राधिकरणाने परवाणगी दिल्यास त्याबदल्यात नुकसान भरपाई वृक्षारोपण म्हणुन तोडल्या जाणा-या वृक्षांच्या वयाच्या संख्ये एवढी झाडे लावुन ७ वर्षापर्यंत संगोपन करणे आवश्यक राहील. स्थानिक वृक्ष प्राधिकरणाने दर पाच वर्षाने किमान एकदा वृक्ष गणना करावी.नविन प्रकल्पांचे आरेखन करताना कमीत कमी झाडे तोडण्यात यावीत या अनुषंगाने पर्यायी विकल्पांचा विचार केला जावा.वृक्ष कर हा वृक्ष लागवड व संगोपनासाठीच खर्च करावा.अश्या व इतर १ ते १३ सुधारणांचा विचार विनियम बैठकीस उपस्थित सदस्यांमध्ये होवुन या सुधारीत कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी नगर शहरात करण्याचा निर्णय घेवुन ठराव मांडण्यात आला.व तो सर्वानुमते मंजुर करण्यात आला.
या वर्षी पावसाळ्यात नगरमध्ये विकासकाकडुन मोठ्या उंचीचे ५००० वृक्ष लागवडीचे नियोजन केले असुन या बाबतची फेरनिविदा प्रकाशीत करुन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना उद्यान विभागास देण्यात आल्या. नागरीकांच्या वृक्षतोडीबाबत आलेल्या अर्जावर विचार विनिमय करुन निर्णय घेण्यात आले. सार्वजनिक जागा तसेच रस्त्याच्या बाजुस असलेल्या वृक्षांच्या धोकेदायक फांद्या,वठलेले वृक्ष काढुन घेण्याचे अधिकार उप-वृक्षाधिकारी यांना देण्यात आले.
या सभेत वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य उपायुक्त- यशवंत डांगे,नगरसेवक- महेंद्र गंधे,हरियालीचे अध्यक्ष- सुरेश खामकर,तुलसीराम पालिवाल, मनपा शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक जुबेर पठाण, बांधकाम विभागप्रमुख- सुरेश इथापे, सामाजीक वनिकरण विभागाच्या सहाय्यक विभागीय अधिकारी- श्रीमती पठाण, यांनी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. सदस्यांचे स्वागत, विषयांचे वाचन व आभार उप-वृक्षाधिकारी तथा प्राधिकरण सचिव शशिकांत नजान यांनी केले.