महसूल विभागाच्या ४२२ प्रकारच्या सेवा-सुविधा ऑनलाईन उपलब्ध सर्वसामान्यांसह विध्यार्थ्यांनी लाभ घ्यावा: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर दि.३ (प्रतिनिधी):- जन्मापासून ते मृत्यपर्यंत सर्वसामान्यांचा महसूल विभागाशी संबंध येतो. महसूल विभागाने आधुनिकतेची कास धरत एक क्लिकवर ४२२ प्रकारचे दाखले व सेवा घरबसल्या सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्वसामान्यांसह विद्यार्थी, विद्यार्थिनीनी या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
महसूल सप्ताहानिमित्त
न्यू आर्ट्स महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत संवाद तसेच नव मतदार नाव नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील , उपजिल्हाधिकारी ( निवडणूक) राहुल पाटील, तहसीलदार संजय शिंदे, रेसिडेन्शिअल महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पोकळे, न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे शिवाजी साबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, पूर्वी सर्वसामान्य व्यक्तीला शासकीय कामासाठी आपला वेळ खर्च करावा लागत होता. परंतु आजच्या डिजिटल युगात शासनाच्या योजनांचा, सेवांचा लाभ एक क्लिकवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचून त्यांना आवश्यक असलेल्या सेवा तातडीने व वेळेत मिळत आहेत. पूर्वीपेक्षा आता क्रांतिकारक असे बदल महसूल विभागात करण्यात आले असून क्यू आर कोड प्रणालीद्वारे विविध प्रकारची माहिती घरबसल्या मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी विद्यार्थ्याशी मनमोकळेपणे संवाद साधत महसूल विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध दाखलयांचे जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मतदान जनजागृती साठीची शॉर्ट फिल्मही उपस्थित विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक तहसीलदार संजय पाटील यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी मानले.
कार्यक्रमासनायब तहसीलदार , मंडळ अधिकारी,तलाठी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.