दुर्लक्षित अल्पसंख्यांक बहुल भागासाठी काँग्रेसच्या माध्यमातून किरण काळेंनी रु. ७६ लाखांचा निधी उपलब्ध करत न्याय दिला – नगरसेवक आसिफ सुलतान

अहमदनगर दि.३० (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून मुकुंद नगर आणि अल्पसंख्याक बहुल भागाकडे विकास कामांच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अनेक नागरी प्रश्न जटिल होत चालले आहेत. मुकुंद नगरच्या या संकट काळात काँग्रेसच्या माध्यमातून किरण काळे यांनी रु. ७६ लाखांचा भरघोस निधी उपलब्ध करून देत न्याय दिला असल्याचे प्रतिपादन नगरसेवक आसिफ सुलतान यांनी केले आहे.
मुकुंदनगर भागातील नागरिकांच्या वतीने नगरसेवक सुलतान व नागरिकांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेत मुकुंद नगरसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करत आभार मानले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, काँग्रेसचे पदाधिकारी डॉ.रिजवान शेख, समद सय्यद, फैजान शेख, मुबीन शेख, हारून शेख, शेर पठाण, जावेद शेख, वकार अहमद जहागीरदार, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुलतान म्हणाले की, आम्ही आजवर रस्ते, गटारी, स्ट्रीटलाइट, पिण्याचे पाणी अशा विविध नागरी प्रश्नांवर महानगरपालिकेमध्ये अनेक वेळा मागण्या केल्या, पाठपुरावा केला. प्रसंगी आंदोलने सुद्धा केली. मात्र त्याला यत्किंचितही प्रतिसाद कुणी दिला नाही. यामुळे मुकुंदनगर आणि अल्पसंख्याक भागासाठी कुणी या शहरात वाली उरला नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती.
अशा संकट काळामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मदतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मुकुंद नगरला न्याय दिला आहे. यासाठी आम्ही ना.थोरात व काळे यांचे आभारी आहोत. मागील ४० वर्षांपासून या भागावर अन्याय झाला आहे. त्यासाठी किरण काळे यांनी थेट कृती करत भरघोस निधी उपलब्ध करून मुकुंद नगरवासियांची मने जिंकली आहेत, असे यावेळी सुलतान म्हणाले.
काँग्रेसचे नेते अनिस चुडीवाला म्हणाले की, किरण काळे हे व्हिजन असणारे नेतृत्व आहे. नगर शहराचे दुर्दैव आहे की नवनीतभाई बार्शीकर यांचा अपवाद सोडला आज पर्यंतच्या राजकीय प्रक्रियेतून असा एकही नेता या शहराला मिळाला नाही की ज्याच्याकडे विकासाचे व्हिजन होते आणि आहे. काळे हे उच्चशिक्षित आहेत. त्यांच्याकडे विकासाच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत आणि त्या सत्यात उतरविण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे. त्याच बरोबर सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका आहे. काळे हेच नगर शहराचा कायापालट करू शकतात, असा विश्वास यावेळी चुडीवाला यांनी व्यक्त केला.