स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेवरून महिला काँग्रेसच्या रणरागिनींनी आयुक्तांना घेरले ; व्यापाऱ्यांच्या आर्थिक नुकसानाला मनपा जबाबदार, मार्केट उध्वस्त करण्याचा डाव : किरण काळेंचा आरोप टमरेला आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा

अहमदनगर दि. २४ ऑगस्ट (प्रतिनिधी) : मध्यवर्ती बाजारपेठेत एकमेव असणाऱ्या महात्मा फुले भाजी मंडईतील स्वच्छतागृहाच्या शौचाच्या भांड्यातून जर घुशी बाहेर येत असतील, काळ्या कुट्ट अंधारात अशा प्रसंगांना महिलांना तोंड द्यावे लागत असेल तर आम्हा महिलांनी जायचं कुठं ? मनपाच्या निष्क्रीय कारभारामुळे शहरातील लाखो महिलांची घरातून बाहेर पडल्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृहां अभावी महिलांच्या होणाऱ्या कुचंबनेला जबाबदार कोण ? असे एक ना अनेक संतप्त सवाल उपस्थित करत शहर महिला काँग्रेसच्या रणरागिनींनी आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले.
शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस शिष्टमंडळाने आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेतली. काँग्रेसच्या वतीने “राईट टू पी – महिलांसाठी स्वच्छतागृह” मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे स्टींग ऑपरेशन सुरू आहे. मागील आठवड्यात गंज बाजारातील भाजी मंडई, रस्ते, स्वच्छतागृहाची पाहणी काळे यांनी केली होती. यावेळी व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यावेळी व्यापाऱ्यांनी अनेक तक्रारी मांडत कामे मार्गी लावावीत यासाठी मनपा समवेत पाठपुरावा करण्याची काळेंकडे मागणी केली होती.
यावेळी दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, सुनील क्षेत्रे, अलतमश जरीवाला, अभिनय गायकवाड, हनीफ जहागीरदार, गौरव घोरपडे, इंजि. सुजित क्षेत्रे, सुनिता भाकरे, जरीना पठाण, मिनाज सय्यद, उषा भगत, पुनम वन्नम, राणी पंडित, हसीना शेख, आकाश आल्हाट, सोफियान रंगरेज, समीर सय्यद, राकेश वाघमारे, आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत आयुक्तांना काँग्रेसने लेखी निवेदन दिले असून या प्रश्नावरून काळे यांनी आयुक्तांना धारेवर धरले. काळे म्हणाले, नगर शहराची एमआयडीसीची अवस्था भयावह आहे. केवळ बाजारपेठेच्या जीवावर या शहरातील व्यापारी, कामगार वर्ग कष्टातून आपले पोट भरत आहेत. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे ग्राहक येत नाहीत. यामुळे व्यवसाय अडचणीत आला आहे. व्यापाऱ्यांच्या या आर्थिक नुकसानीला मनपा जबाबदार असल्याचा आरोप यावेळी काळेंनी केला. पावसाळा लक्षात घेता रस्त्यांवर तात्पुरती मात्र दर्जेदार पद्धतीने डागडुजीची कामे हाती घ्यावीत. पावसाळा संपताच रस्त्यांच्या कामाला सुरुवात करावी. त्यासाठीच्या आवश्यक त्या तांत्रिक बाबींची आत्त्ताच पूर्तता करुन घेत नियोजन करण्याची मागणी यावेळी काळेंनी केली.
मार्केट उध्वस्त करण्याचा डाव :
काँग्रेसने दावा केला आहे की, महात्मा फुले भाजी मंडई देखील पुनर्विकासित करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे मंडईतील अनेक भाडेकरू व्यापारी, भाजी, फळ विक्रेते यांच्या पोटावर पाय देण्याचे पाप करण्यासाठी पुढारी, अधिकारी यांच्यामध्ये संगमताने अंधारात दाळ शिजवली जात आहे. मनपाने भाडेकरूंना विश्वासात न घेता एकतर्फी भाडेवाढ केली आहे. भाडेकरूंना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही प्लॅन काँग्रेस मंजूर करू देणार नाही. मनपाने आधी नेहरू मार्केट, शरण मार्केट पाडले. इतकी वर्ष उलटली तरी देखील अजून यांना ते साधे उभे करता आले नाही. फुले मंडईचा आधी रिडेव्हलपमेंटचा प्लॅन दाखवा. त्याच्या सर्व मंजुऱ्या दाखवा. आर्थिक तरतूद बँक खात्यावर जमा असल्याचे दाखवा. तरच या विषयाला हात लावा. अन्यथा काँग्रेस आक्रमक पवित्रा घेईल, असा इशारा काळेंनी दिला आहे.
महात्मा फुले यांच्या पुतळ्याची अवहेलना :
मंडईला थोर समाज सुधारक महात्मा फुलेंचे नाव आहे. माञ मंडईच्या आत घाणीचे साम्राज्य, जनावरांचे मलमूत्र, आणि दुर्गंधीच्या विळख्यामध्ये फुलेंचा पुतळा सापडला आहे. यावर काळेंनी तीव्र संताप व्यक्त केला. पुतळ्याची मनपाकडून अक्षम्यरित्या अवहेलना सुरू आहे. याबाबत तात्काळ पावले उचलत पुतळ्याची रंगरंगोटी, मंडईची स्वच्छता व आवश्यक ती डागडुजी तातडीने करण्याची मागणी यावेळी आयुक्तांकडे किरण काळेंनी केली.
अन्यथा टमरेला आंदोलन करणार :
दरम्यान भुतकरवाडीतील महेश कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये मनपाची ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे संडासची घाण जात आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाठपुरावा करून देखील हा प्रश्न सुटत नाही. याबाबत मनपाने कारवाई न केल्यास किरण काळे यांनी नागरिकांसह मनपाच्या दारात काँग्रेस कार्यकर्ते संडासचे टमरेल घेऊन आंदोलन करतील असा इशारा मनपाला दिला आहे.
आयुक्तांची स्वच्छतागृह दाखवण्यास नकार :
यावेळी किरण काळे यांनी आयुक्तांना त्यांचे मनपा कार्यालयातील स्वच्छतागृह दाखवण्याची मागणी केली. मात्र त्यांनी त्यास नकार दिला. आयुक्तांचे स्वतःच्या कार्यालयातील संडास स्वच्छ आहे. नागरिकांच्या करातून मनपा चालते. तुम्ही जी स्वच्छतेची सुविधा मनपाकडून घेता तीच नागरिकांना पण द्या, असे खडे बोल यावेळी काळेंनी आयुक्तांना सुनावले.