कृषी क्षेत्रामध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञान फायदेशीर – प्रमुख संशोधक प्रा. कवी आर्या

कृषि क्षेत्रामध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञान फायदेशीर
– प्रमुख संशोधक प्रा. कवी आर्या
राहुरी / प्रतिनिधी —
कृषि क्षेत्रात दिवसेंदिवस मजुरांची समस्या वाढत आहे. कृषि क्षेत्राबरोबरच कृषि क्षेत्राशी संबंधीत उद्योगांमध्ये मजुरांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असते. यावर रोबोटिक्स तंत्रज्ञान फायदेशीर ठरु शकते. रोबोटिक्स तंत्रज्ञानातुन मजुरांच्या उपलब्धतेच्या समस्येवर मार्ग काढता येईल असे प्रतिपादन आयआयटी मुंबईच्या ई-यंत्र प्रकल्पाचे प्रमुख संशोधक प्रा. कवी आर्या यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय व आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या ई-यंत्र (रोबोट प्रशिक्षण) प्रयोगशाळेचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने प्रा. कवी आर्या यांनी केले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक व कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार व कृषी यंत्र व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, डॉ. अवधूत वाळुंज, डॉ गिरीषकुमार भणगे इंजि. योगेश दिघे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी प्रा. कवी आर्या पुढे म्हणाले की कृषि क्षेत्रातील मजुरांच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी ई-यंत्र लॅबचा उपयोग एम्बेडेड सिस्टीम शिकण्यासाठी व त्याचा व्यावहारिक उपयोग वाढवण्यावर भर दिला पाहिजे. यातुनच यशस्वी उद्योजक तयार होतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाविद्यालयामध्ये या प्रयोगशाळेच्या स्थापनेकरता महाविद्यालयातील दोन प्राध्यापक व कास्ट प्रकल्पातील दोन संशोधन सहयोगी यांच्या टीमने दोन दिवसीय प्रशिक्षण पूर्ण केले व फायर बर्ड ५ हा रोबोट आयटी मुंबईने भेट दिला. तसेच या टीमने विशेष कार्य आधारित प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. या ई-यंत्र लॅबसाठी आयआयटी मुंबईचे तांत्रिक सहाय्य असून तिला नॅशनल मिशन ऑफ एज्युकेशन अंतर्गत एम एच आर डी द्वारे निधी उपलब्ध झाला आहे.
यावेळी डॉ. पवार यांनी विद्यापीठातील विविध प्रकल्पांची, संशोधन व विकसित तंत्रज्ञानाची माहिती दिली आणि कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये एम्बेडेड सिस्टीम चा समावेश करण्यासाठी आयआयटी, मुंबईने सहकार्य करावे असे मत मांडले. डॉ. गोरंटीवार यांनी कास्ट प्रकल्पाची माहिती दिली व विविध संशोधनामध्ये वापरात असलेल्या आयवोटी तंत्रज्ञानाची माहिती दिली. डॉ. सचिन नलावडे यांनी ई-यंत्र लॅबबद्दल माहिती दिली. कास्ट प्रकल्पाच्या साह्याने विकसित करण्यात आलेल्या विविध रोबोट, तसेच विद्यार्थ्यांना लागणार्या विविध रोबोटिक्स यंत्रणा याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार डॉ. सचिन नलावडे यांनी मानले.