राजकिय

किरण काळेंचा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा! भावनिक पत्र लिहित बाळासाहेब थोरातांचे मानले आभार, लवकरच पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क -अहिल्यानगर दि :10 फेब्रुवारी (प्रतिनिधी) : आक्रमक तरुण नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या किरण काळे यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना त्यांनी राजीनामा पाठविला आहे. राजीनामा देत काँग्रेस मधून बाहेर पडण्याचे कारण मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. थोरात यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी असणाऱ्या काळेंच्या या निर्णयामुळे मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लवकरच पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचे काळे यांनी सोशल मीडियातून पोस्टद्वारे म्हटले आहे.
सुमारे साडेचार वर्षांपूर्वी थोरातांनी काळेंच्या खांद्यावर शहर काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा सोपविली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी आलेल्या पटोले यांनी काळे यांची फेरनिवड करत त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली होती. ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी काही काळ काळे यांच्यावर सोपविण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत नगरची जागा काँग्रेसकडे घेत काळेंना उमेदवारी देण्याचे सुतोवाच स्वतः थोरातांनी अनेक वेळा केले होते. आमदारकीच्या उमेदवारीचा चेहरा म्हणून त्यांना काँग्रेसने शहरात प्रोजेक्ट केले होते. परंतू वाटाघाटीत काँग्रेसला ही जागा सुटली नव्हती. मात्र काळे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये शहरातील गतप्राण झालेल्या काँग्रेसला नवसंजीवनी दिली. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. चार दिवसांपूर्वी संगमनेर येथे थोरात यांची समक्ष भेट घेत चर्चा केल्यानंतर काळे यांनी राजीनामा दिला आहे.
किरण काळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर पत्र लिहीत थोरातांचे आभार मानले आहेत. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या, वलयांकित राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या, तरुण नेतृत्वाला अत्यंत कमी वयात राष्ट्रीय पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी थोरातांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शहरातील विविध समस्या सोडण्यासाठी मी काम करू शकलो. सत्तांतरा नंतर विरोधी पक्ष म्हणून नागरिकांच्या हितासाठी कायम संघर्षाची भूमिका घेतली. या काळात थोरातांनी मला बळ दिले. भरभरून प्रेम दिलं. माझ्या कामाचा गौरव केला. त्यामुळे अहिल्यानगरच्या विकासासाठीची आणि शहराला दहशतमुक्त करण्यासाठीची लढाई लढण्या करिता मला कायम प्रेरणा मिळाली.
थोरातांवर कोणतीही नाराजी नाही :
पत्रात काळेंनी म्हटले आहे की, विधानसभेला जागा काँग्रेस पक्षाला मिळावी आणि मला उमेदवारी मिळावी याकरिता बाळासाहेब थोरातांनी मनापासून टोकाचे प्रयत्न केले. माझी थोरातांवर कोणतीही नाराजी नाही. शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडे त्यांनी माझ्यासाठी आग्रह धरला. शरद पवार यांच्याकडे समक्ष घेऊन जात माझ्यासाठी जागा द्या म्हणून आग्रही मागणी केली. पण जागा वाटपाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये शहराची जागा काँग्रेसला मिळू शकली नाही. जर जागा आणि लढण्याची संधी मिळाली असती तर नक्की विजय मिळविला असता.
काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख निर्माण केली :
काँग्रेस हा तसा शांत, संयमी पक्ष म्हणून ओळखला जातो. आजवर शहर जिल्हाध्यक्ष, ग्रामीण जिल्हाध्यक्ष या पदांवर अनेक मातब्बर, ज्येष्ठ नेत्यांनी काम केले आहे. नगर शहरात किरण काळे यांनी मात्र काँग्रेस पक्षाच्या स्वभावा विरुद्ध अत्यंत आक्रमक अशा रीतीने काम केले. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे शहरासह जिल्ह्यात काँग्रेस कायम चर्चेत असायची. जुन्यां बरोबरच अनेक नवीन कार्यकर्त्यांचा संच त्यांनी उभा केला होता. बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या रूपाने एक तरुण तडफदार शिलेदार मिळाला होता. मात्र आता काळे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचा आवाज पूर्वीसारखा आक्रमक राहणार की नाही हे काळच ठरवेल.
लवकरच पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार :
दरम्यान, लवकरच पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचे किरण काळे यांनी समाज माध्यमांद्वारे म्हटले आहे. काळे कोणत्या पक्षात जाणार याबाबत त्यांनी काही म्हटले नसले तरी देखील ते महाविकास आघाडीतच राहणार की महायुतीत जाणार हे पाहावे लागणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे