छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार शहरातील प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचविणार – किरण काळे-
तरुणाईला प्रेरणा देणाऱ्या काँग्रेसच्या ५००० शिवचरित्र वाटप मोहिमेचा शिवजयंती दिनी झाला शुभारंभ !

अहमदनगर दि.20 (प्रतिनिधी) : शिवजयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे शिवप्रेमींचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील कॉ.गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक वाटपाच्या मोहिमेचा शुभारंभ शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. शिवजयंती दिनी ५०० पुस्तके वाटून ही मोहीम सुरु झाली आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार शहरातील प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचविणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.
यावेळी जयसिंगराव पवार यांचे “शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे ?”, “शिवछत्रपती – एक मागोवा”, पवार यांनी संपादित केलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांवरील ‘छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ’, महामानव, घटना शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेल्या ‘माझी आत्मकथा’, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्याचा आसूड’, ‘गुलामगिरी’ ही पुस्तके देखील शहरातील तरुण मुलांना वाचनासाठी काँग्रेसच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
याबाबत काळे म्हणाले की, अलीकडील काळात शिवजयंती उत्सवाला वेगळे वळण लागले असून यातून तरुण पिढीला चुकीचा संदेश जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे प्रशासन, शासन, त्यांनी राबविलेले जनकल्याणाचे स्वराज्य, समाजातल्या अठरापगड जाती-धर्मांना एकीने पुढे घेऊन जाणे अशा विविध बाबींची माहिती आजच्या तरुण पिढीला व शालेय विद्यार्थ्यांच्या मध्यातून भावी तरुण पिढीला होणे अत्यंत आवश्यक आहे. महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने तरुण पिढीने जल्लोष करणे यात काही वावगे नाही.
मात्र हा जल्लोष महाराजांच्या विचारांना साजेसा असणे आवश्यक आहे. यालाच जोड देत शिवजयंती ही निश्चितच वैचारिक पद्धतीने देखिल साजरी होणे गरजेचे आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती दिनी ५०० पुस्तकांचे वितरण करून या वैचारिक चळवळीला शहरात सुरुवात करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित पुस्तके देखील वितरित करण्यात येणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.
काँग्रेस बरोबरच या पुस्तकाचे वितरण विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या छात्रभारती संघटना, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद या संस्थांच्या वतीने देखील करण्यात येत आहे. नगरचे सुप्रसिद्ध निवेदक उद्धव काळापहाड यांनी या पुस्तकाचे ऑडिओ बुक तयार केले असून ते देखील यु ट्यूबवर शिवप्रेमींसाठी उपलब्ध असून आजवर ५०,००० हून अधिक नेटकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. शहरातील एका संघटनेने या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत पुस्तक वाटपाला विरोध केला असून तसे पत्र देखील कोतवाली पोलिस स्टेशनला दिले आहे. मात्र हा विरोध झुगारून काँग्रेसने या मोहिमेला सुरुवात केली आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की, हे पुस्तक सन १९८८ साली प्रकाशित झाले असून त्याच्या आजवर ७० पेक्षा जास्त आवृत्त्या बाजारात आल्या आहेत. दिवंगत कॉम्रेड पानसरे यांनी या पुस्तकावर सबंध महाराष्ट्रामध्ये शेकडो व्याख्यानं केली आहेत. पुरोगामी चळवळीतील अनेक संघटना, कार्यकर्ते यांनी या पुस्तकाच्या आजवर हजारो प्रति तरुण पिढीला वाटल्या आहेत. ज्यांना या पुस्तका विषयी आक्षेप आहे त्यांनी आधी स्वतः हे पुस्तक वाचावे आणि मगच अभ्यास करुन आपले मत व्यक्त करावे. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवप्रेमींचे आराध्य दैवत आहेत. महाराजांचे विचार घराघरात पोहोचविण्याच्या काँग्रेसच्या मोहिमेत कोणी विनाकारण राजकीय हेतूने अडथळा करू नये असे आवाहन काँग्रेसने केले आहे.
यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, खलील सय्यद, दशरथ शिंदे, अनंतराव गारदे, प्रविण गीते, निजाम जहागीरदार, अनिस चुडीवाल, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, अन्वर सय्यद, विशाल घोलप, ओम नऱ्हे, आकाश बारस्कर, उषा भगत, जरीना पठाण, राणी पंडित, शारदाताई वाघमारे, हेमलता घाडगे, अमृता कानडे, बिबीशन चव्हाण, प्रशांत जाधव, संजय भिंगारदिवे, प्रमोद डांगे, गणेश आपरे, गौरव घोरपडे, सागर चाबुकस्वार, मोहनराव वाखुरे,सागर ईरमल, शंकर आव्हाड, विकी करोलिया, हर्षल काकडे, विनोद दिवटे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.