भिंगारकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस लढा उभारणार – सागर चाबुकस्वार

भिंगार दि.२९ जुलै (प्रतिनिधी): भिंगार शहर हे सुरुवातीपासून कॅन्टोन्मेंट क्षेत्रामध्ये राहिले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत कॅन्टोन्मेंट असल्यामुळे राज्य सरकारची मदत या भागाला कधी मिळू शकली नाही. भिंगारचा समावेश स्थानिक स्वराज्य संस्थेत करायचा की नाही याबाबत शासनस्तरावरती प्रक्रिया सुरू आहे. यावरचा निर्णय जेव्हा व्हायचा तेव्हा होईल. मात्र भिंगारकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस लढा उभारेल, असे प्रतिपादन भिंगार काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी केले आहे.
चाबुकस्वार यांची भिंगार शहर काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भिंगारकरांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब भिंगारदिवे, संतोष धिवर, प्रल्हाद भिंगारदिवे, सतिष बोरूडे, अच्युत गाडे, श्रृजन भिंगारदिवे, सुमित गोहेर, नयन बोरूडे, लखन छजलानी, प्रसाद पाटोळे, निखिल चाबुकस्वार, राजु कडुस, कैलास वाघस्कर, अभिजित मकासरे आदींनी सत्कार केला. त्यावेळी चाबुकस्वार बोलत होते.
चाबुकस्वार पुढे म्हणाले की, भिंगारकरांची आजही पाण्यासाठी ससेहोलपट सुरू आहे. यामुळे विशेषतः महिला वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. भिंगारकरांना त्यांच्या हक्काचे पिण्याचे पाणी मिळण्याचे गरज आहे. या कामी भिंगार काँग्रेस लक्ष घालणार असून भिंगारकरांना त्यांच्या हक्काचे पिण्याचे पूर्ण वेळ, पूर्ण दाबाने, मुबलक व स्वच्छ पाणी लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी यंत्रणेकडे पाठपुरावा केला जाईल. वेळेप्रसंगी तीव्र भूमिका भिंगारवासीयांच्या हितासाठी काँग्रेस घेईल.
बाळासाहेब भिंगारदिवे म्हणाले की, सध्या देशात आज आझादीका अमृत महोत्सव सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये काँग्रेसचा सहभाग मोलाचा राहिला आहे. समाजातील सर्व धर्म, जाती, विविध घटक यांना सोबत घेऊन काँग्रेसने नेहमीच काम केले आहे. चाबुकस्वार यांच्या रूपाने माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मागासवर्गीय समाजाला भिंगारमध्ये महत्त्वाच्या पदावर नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल भिंगारकर काँग्रेस पक्ष व थोरात, काळे यांचे ऋणी आहेत.
यावेळी अच्युत गाडे, श्रृजन भिंगारदिवे, सुमित गोहेर, नयन बोरूडे, लखन छजलानी, प्रसाद पाटोळे, निखिल चाबुकस्वार आदरणीय आपली मनोगते व्यक्त केली.