पोलिस मुख्यालयातील वसाहतींच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात गृहमंत्र्यांना पोलिस बॉईज असो.चे निवेदन
गृहमंत्री वळसे यांनी स्वतः लक्ष देण्याचे दिले आश्वासन

नगर(प्रतिनिधी) -अहमदनगर पोलिस मुख्यालयातील वसाहतींची अतिशय दुरावस्था झाली असून, या वसाहतींचे नुतनीकरण करण्यात यावी, या मागणीचे निवेदन गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांना पोलिस बॉईज असोसिएशनच्यावतीने देण्यात आले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष नितीन खंडागळे, उपाध्यक्ष मंदार लष्कर, सचिव सिद्धार्थ ससाणे, खजिनदार संकेत पवार, वसिम शेख, सतीश मुंडलिक, नंदू साबळे, विजय काळे, संतोष सासवडे, गणेश लष्कर, सचिन बर्डे, अजय आव्हाड, संदिप गायकवाड, शुभम गाडे, सचिन लष्करे, अविनाश भोईटे, सचिन मुळे, राजू आडसूळ, अॅड.समीर पटेल, देवेंद्र जोशी, संतोष तुपे आदि उपस्थित होते.
गृहमंत्र्यांना देण्यात आलेले निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर पोलिस मुख्यालयातील वसाहत या 100 वर्षापूर्वीच्या ब्रिटीशकालीन असून, या वसाहतींची अत्यंत दुरावस्था झाली आहे. हे ठिकाण पोलिस परिवारातील सदस्यांना राहण्यायोग्य नसून कौले तुटलेले असल्याने पावसाळ्यात गळती होत आहे. गेल्या पावसाळ्यातच भिंतीत लाईटचा करंट उतरुन एमबीए झालेली पोलिसांच्या मुलीचा करुण अंत झाला. लाईट,पाणी, ड्रेनेज, रस्ते, आदिं समस्या झोपडपट्टीपेक्षा बिकट परिस्थितीत आहे. जनतेचे रक्षण करणार्या पोलिससह त्यांच्या परिवारास अक्षरश: नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. याबाबत वेळोवेळी संबंधित अधिकारी, विभागांना पत्र, निवेदने दिली आहेत, परंतु कोणत्याही प्रकारे कार्यवाही होत नाही. तेव्हा आपण स्वत:यामध्ये लक्ष घालून पोलिस वसाहतींचे नुतनीकरण करण्यात येऊन या पोलिस व त्यांच्या कुटूंबियांना चांगल्या सुविधांसह वसाहत निर्माण करुन द्यावी, अशी विनंती करण्यात आली.
याप्रसंगी नितिन खंडागळे यांनी ना.वळसे पाटील यांना याबाबत चर्चा करुन परिस्थितीची सखोल माहिती दिली. ना. वळसे पाटील यांनी याबाबत आपण स्वत: लक्ष घालून संबंधितांशी चर्चा करुन तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचना देऊ, असे आश्वासन दिले.