शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील शासन आपल्या दारी उपक्रमात नागरिकांच्या भेटी

शिर्डी, दि.१० जून २०२३ (प्रतिनिधी) – एक रुपयात विमा योजनची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र राज्य देशात एकमेव ठरले आहे. शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे. असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी राहाता तालुक्यातील रामपूरवाडी, न.पा.वाडी, शिंगवे येथे नागरिकांच्या भेटी घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, जलसंपदा विभागाचे महेश गायकवाड, बांधकाम विभागाचे अभियंता देविदास धापटकर यांच्यासह सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, शासन आपल्या दारी उपक्रमाचा उद्देश लोकांची शासन दरबारी अडकलेली काम मार्गी लागावी हा आहे. या उपक्रमातून सरकार आणि सामान्य नागरीक यांच्यातील दरी कमी होईल.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी शासनाने केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही त्यांच्या कागदपत्रातील त्रुटी अधिकाऱ्यांनी दूर करून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला पाहिजे. समाजातील शेवटच्या माणसाला त्याच्या हक्काचे लाभ मिळावे. यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ येवू नये. आता सर्वच मंत्री या उपक्रमातून लोकांमध्ये जात आहे. अधिकाऱ्यांनी देखील आता लोकांपर्यत पोहचले पाहिजे.अशी अपेक्षा ही महसूलमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
महसूल विभागाच्या माध्यमातून वाळूचे सर्वकष धोरण कार्यान्वित झाले. आता रात्रीची वाळू वाहतूक बंद झाली. दिवसा कायदेशीरपणे वाळू वाहतूक सुरू आहे. ट्रॅक्टरमधून वाळू वाहतुकीला परवानगी दिली आहे. राहाता तालुक्यातील बहुतांशी गावातील मोजणीचे प्रकरण मार्गी लागत आहे. जून पर्यत प्रलंबित प्रकरण मार्गी लागतील. रोव्हर तंत्रज्ञानाची मोठी मदत यासाठी झाली. भविष्यात मोजणीचा अर्ज दाखल झाल्यापासून पंधरा दिवसात निकाली काढण्यासाठीचे धोरण घेण्यात आले आहे.
शेतशिवार रस्ते पाणद रस्त्यांच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी कोणाचेही अतिक्रमण असले तरी गंभीरतेने कारवाई करण्याच्या सूचना देवून याबाबत मलाही कोणी फोन करु नका. हे रस्ते पावसाळ्यापुर्वी मोकळे करण्यासाठी महसूल यंत्रणेने तत्परता दाखवावी. अशा सूचना श्री.विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.