संविधानामुळे देशाची लोकशाही व्यवस्था भक्कम – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील प्रवरानगर येथे संविधान दिन साजरा

शिर्डी, दि.२७ नोव्हेंबर -“स्वातंत्र्य समता आणि बंधूतेचा संदेश देणाऱ्या संविधानामुळेच देशातील लोकशाहीची व्यवस्था भक्कमपणे उभी आहे ” असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले .
संविधान दिनाच्या निमित्ताने प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी संविधानाचे पूजन करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमापुर्वी २६/११ च्या मुंबई येथील आंतकवाद्याच्या हल्ल्यात शहीद झालेले जवान आणि नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
महसूलमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, “संविधानाचा मसूदा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचा मसूदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्विकारला तो ऐतिहासिक दिवस संविधान दिन म्हणून देशात अभिमानाने साजरा होतो. राज्य सरकारने आजपासून महापरीनिर्वाण दिनापर्यत समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.”
“संविधानाने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता आणि बंधूतेचा मंत्र दिला. जगातील सर्वच देशात आपले संविधान श्रेष्ठ मानले जाते. सर्व जाती धर्म भाषा आणि प्रांत यांना समान हक्क आणि अधिकार देणाऱ्या संविधानामुळेच देशातील लोकशाहीची व्यवस्था भक्कमपणे उभी आहे.” असेही महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी डॉ विखे पाटील कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वासराव कडू, चाचा तनपुरे, विठ्ठलराव लंघे यांच्यासह कारखान्याचे संचालक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.