प्रशासकिय

‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमासाठी जिल्‍हा प्रशासन सज्ज जिल्ह्यात ९ लाख ३३ हजार घरांवर फडकणार तिरंगा ध्‍वज – जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

अहमदनगर, 5 ऑगस्‍ट (प्रतिनिधी) – भारतीय स्‍वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर जनतेच्‍या मनात या स्‍वातंत्र्य लढ्याच्‍या स्‍मृती तेवत राहाव्‍यात, स्‍वातंत्र्य संग्रामातील अज्ञात, नायक, क्रांतीकारक, स्‍वातंत्र्य संग्रामात घडलेल्‍या विविध घटना यांचे स्‍मरण व्‍हावे, देशभक्‍तीची जाज्‍वल्‍य भावना कायम स्‍वरूपी जनमाणसात राहवा, या उद्देशाने स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव राज्‍यभरात राबविण्‍यात येत आहे. याचाच एक भाग म्‍हणून १३ ते १५ ऑगस्‍ट, २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम जिल्‍ह्यात उत्साहात राबविण्‍यात येणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन सज्‍ज झाले असून जिल्‍ह्यात 9 लाख 33 हजार घरांवर तिरंगा ध्‍वज फडकणार असल्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित याबाबत बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्‍त डॉ. पंकज जावळे उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी डॉ. भोसले म्‍हणाले, जिल्‍हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच शासनाच्या विविध विभागांच्यावतीने यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्‍ह्यातील सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे. ”घरोघरी तिरंगा” मोहिमेसाठी विभागात विविध माध्यमातून राष्ट्रध्वज उपलब्ध होत आहेत. सुनिश्चित केलेल्या दराने राष्ट्रध्वज सर्वांना खरेदीसाठी महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, पोस्‍ट कार्यालय, स्वस्त धान्य दुकाने, बचत गट इत्यादी माध्यमातून राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध असतील. अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ७५ हजार घरांवर राष्ट्रीय ध्वज फडकविण्‍यात येणार आहे. जिल्‍हा परिषदेकडून 75 हजार, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून १ लाख १९ हजार राष्‍ट्रध्वज पुरविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जवळपास ८ लाख ३० हजार राष्‍ट्रध्वज उपलब्‍ध झाले, असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली. या उपक्रमासाठी जिल्‍हाभरातून ११ हजार ३८८ स्वयंसेवकांची नियुक्त करण्यात आली असून त्यांच्यामार्फत राष्‍ट्रध्वज फडकावणे आणि ध्वजसंहितेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सध्या मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्रातुन नागरिकांचा या उपक्रमासाठी सहकार्य मिळत असल्याचे सांगून लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना, कंपन्या यांनी या राष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्‍यासाठी जनजागृती करण्‍यात येत असून यामध्‍ये प्रभात फेरी, चित्रकला स्पर्धा, चर्चासत्र आणि विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी उपक्रमाच्‍या माहिती संदर्भात फलक उभारण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत 13 ते 15 ऑगस्‍ट 2022 दरम्‍यान घरावर फडकावण्‍यात येणारे राष्‍ट्रध्‍वज उतरविणे आवश्‍यक नाही. परंतु शासकीय कार्यालयांना यासंबंधी ध्‍वज संहितेचे पालन करणे आवश्‍यक आहे.
वरील सर्व उपक्रम राबविताना भारतीय ध्वज संहितेचे पालन होणे आवश्यक असून जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे