ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज मतदानपूर्व तयारीचा राहाता येथे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

शिर्डी, दि.१७ डिसेंबर (प्रतिनिधी) – राहाता तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींसाठी उद्या, १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी तालुका निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी राहाता तहसीलमध्ये आज भेट देऊन मतदानपूर्व तयारीचा आढावा घेतला. निवडणूक सुरळीत पाडण्यासाठी सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
राहाता तालुक्यातील साकुरी, रांजणखोल, खडकेवाके, सावळीविहीर बु., डोऱ्हाळे, आडगाव खु., न.पा.वाडी, निघोज, नांदुर्खी बु., नांदुर्खी खु.,व राजूरी या ११ ग्रामपंचायतीसाठी मतदान रविवार, १८ डिसेंबर २०२२ रोजी पार पडणार आहे. लोहगाव ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
राहाता तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या ४८ वॉर्डमध्ये १३२ जागांसाठी या निवडणुका होत आहेत. यासाठी ४९ मतदान केंद्रावर २७५ अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदार केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदार अधिकारी, १ शिपाई व १ पोलीस नियुक्त करण्यात आला आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान करता येईल. मतमोजणी २० डिसेंबर रोजी सकाळी राहाता तहसील कार्यालयात पार पडणार आहे.
ईव्हीएम मशिनचे प्रात्यक्षिक सादरीकरण यावेळी मतदान केंद्राध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे केले. मतदान प्रक्रियेत येणाऱ्या संभाव्य अडचणी, मतदान प्रक्रिया दिवसभर पार पाडताना मतदान केंद्रावरील उपस्थित सर्व कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. अशी माहिती राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.