अहमदनगर दि. 24 ऑगस्ट (प्रतिनिधी )
बदलापूरची दुर्दैवी घटना ही माणसाच्या माणूसपणाला काळीमा फासणारी आहे. राज्यामध्ये लहान मुली, महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. सत्तेच्या अडून नराधमांना आणि संबंधित संस्था प्रशासनाला पाठीशी घालत वाचविण्याचे पाप सरकार करीत आहे. पीडित मुलींच्या पालकांना बारा बारा तास पोलिसांनी एफआयआर न नोंदवता अन्याय केला. मात्र बदलापूर रेल्वे स्टेशनवर सर्वसामान्य नागरिक असणाऱ्या आंदोलकांनी लोकशाही मार्गाने यावर आपली आंदोलनात्मक प्रतिक्रिया दिली, तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंदविले गेले. सामान्य नागरिकांच्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणून हिनविण्यात आले. कुणीही याबाबत राजकारण करू नये. काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. पिडीततांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने फास्टट्रॅक विकासाच्या माध्यमातून आरोपींना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेची मी मागणी करतो. नगर शहरातील सर्व शाळांमध्ये मुलींची स्वच्छतागृह स्वच्छ असावीत, तिथे साफसफाई करता महिला कर्मचारी असावी याकरिता शालेय शिक्षण विभागाने कठोर पावले उचलावी. प्रत्येक शाळा परिसरात सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य करावे. शाळेमध्ये कामकाजासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी. शाळेतील मुला, मुलींना गुड टच, बॅड टच याबाबत या विषयातील तज्ञ लोकांमार्फत जनजागृती करणारे विशेष अभियान शहरातील सर्व शाळांमध्ये राबवण्याची मागणी शालेय शिक्षण विभागाकडे शहर काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यावेळी बोलताना केली आहे.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुजित क्षेत्रे , युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, सामाजिक न्याय विभाग युवा आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष गौरव घोरपडे, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोसीम शेख, भिंगार काँग्रेसचे शामराव वाघस्कर, अल्पसंख्यांक काँग्रेस शहराध्यक्ष चंद्रकांत ऊजागरे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा