दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीवर राहुरी पोलिसांचा छापा! तीन जणांना घेतले ताब्यात!

राहुरी- ताहराबाद रोडवर असलेल्या घोरपडवाडी घाटात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीवर राहुरी पोलिस पथकाने पहाटेच्या दरम्यान छापा टाकला. यावेळी तिघांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. तर चार दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले।
दि, ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास पोलिस पथकाला गुप्त खबर मिळली. त्यानूसार पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक चारूदत्त खोंडे, हवालदार हनुंमत आव्हाड, पोलिस शिपाई सचिन ताजणे, नदीम शेख, अमोल पडोळे, अंकुश भोसले आदिंच्या पोलिस पथकाने राहुरी ताहराबाद रोडवर असलेल्या घोरपडवाडी घाटात छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणी काही दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसले होते.
विशाल सुभाष बर्डे, (वय १९ वर्षे, )संदीप दिगंबर माळी( वय २० वर्षे,) सागर अशोक बर्डे (वय २२ वर्षे,) सर्व राहणार बारागाव नांदूर, ता. राहुरी. असे पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. तर भोंद्या उर्फ रवींद्र सूर्यभान माळी, अर्जुन भास्कर माळी, दोघे राहणार बारागाव नांदूर, ता. राहुरी. तसेच
इतर दोन अनोळखी इसम असे चारजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
पकडलेल्या आरोपींकडून चार मोटरसायकली, सत्तूर, मिरची पूड, चाव्यांचा जूडगा असा एकूण एक लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटने बाबत पोलिस शिपाई सचिन ताजणे यांच्या फिर्यादीवरून सात दरोडेखोरांवर गुन्हा रजि. नं. १०३५/२०२२ भादवि कलम ३९९, ४०२ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.