शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उद्या माजीमंत्री राम शिंदेच्या नेतृत्वाखाली भाजपाचा कर्जतला रास्ता रोको आंदोलन

कर्जत( प्रतिनिधी) : दि ८
कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नासाठी आणि मागण्यासाठी माजीमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्यावतीने बुधवार, दि ९ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
मागील दोन वर्षांपासून कुकडी आवर्तनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. अनियमित कुकडी आवर्तनाने लाभ क्षेत्रातील फळबागा उजाड होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाच्या २५ मार्चनंतरच्या आवर्तनाने उभी असलेली पिके जळून जातील. त्यामुळे तात्काळ कुकडी आवर्तन मिळावे. यासह शेती पंपासाठी पूर्ण दाबाने उपलब्ध न होणारी वीज, महावितरण आणि राज्य सरकार यांची पठाणी वसुली, बील न भरल्यास शेतपंपाचे ट्रान्सफार्मर बंद करने यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून बहरलेली ऊस शेती तोडणी अभावी संकटात आली आहे. काही ठीकाणी ऊस पिकाने तुरा फेकलेला आहे. उसतोडीसाठी जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊस कवडीमोल भावाने खरेदी करून त्यांची अडवणूक आणि पिळवणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिल्लक ऊस पिकासाठी तात्काळ मनुष्यबळ उपलब्ध करीत त्याची तोड करावी यावर माजीमंत्री राम शिंदे यांनी आंदोलन छेडले आहे. आंदोलनात सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कर्जत भाजपाच्यावतीने करण्यात आले आहे.