बोल्हेगाव परिसरात अवैध धंदे करणाऱ्या कचरे टोळीच्या मुसक्या आवळा ; काँग्रेसची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

अहमदनगर दि.९ मे (प्रतिनिधी) : बोल्हेगाव परिसरामध्ये अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. नागरी वस्तीमध्ये देखील अवैद्य धंदे करणारे दमदाटी, दहशत करत असून जागांवर बेकायदेशीर ताबा मारत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. यामुळे महिलांची कुचुंबणा होत असून तरुण पिढी वाम मार्गाला लागत आहे. बोल्हेगाव परिसरामध्ये मटका किंग श्रीराम उर्फ राजू कचरे टोळीने धुडगूस घातला आहे. या टोळीच्या मुसक्या आवळा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना लेखी निवेदन देत करण्यात आली आहे.
शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने नागरिकांच्या शिष्टमंडळासह एसपींची भेट घेतली आहे. यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, आनंद जवंजाळ, प्रणव मकासरे, अभिनय गायकवाड, अलतमश जरीवाला, हाफिज सय्यद, इंजि. सुजित क्षेत्रे, मनसुख संचेती, विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, गणेश आपरे, उषाताई भगत, शैलाताई लांडे, हर्षल उजागरे, आकाश पाटोळे, राजू क्षेत्रे, समीर शेख, आकाश जवंजाळ, अक्षय साळवे, वैभव दिवटे, कुणाल उजागरे, सुमित चव्हाण, राकेश पवार, सुरेश बोडके, सुरेखा उजागरे, काजल अल्हाट, छाया आल्हाट, कमल हिवाळे, आशा सोनवणे, शितल क्षेत्रे, शामल साळवे, वैशाली रणसिंग, सुरेखा पवार आदींसह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, राजरोसपणे कचरे हा आपल्या टोळीसह दिवसाढवळ्या नागरी वस्तीमध्ये तोफखाना पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मटका अड्डे चालवून अवैध धंदे करत आहे. तसेच आंबेडकर नगर येथील चोभे कॉलनीतील मोकळ्या जागेवर ताबा मारून मटक्याचा अड्डा सुरू करण्यासाठी स्थानिक रहिवाशांवर, महिलांवर दहशत करत आहे. कचरे आणि त्याचे साथीदार नामे श्याम कदम, निरज तांबे, अक्षय धाडगे आणि इतर हे स्थानिक महिला, नागरिक यांच्यावर दहशत करीत आहेत.
शहर विकासासाठी काम करणाऱ्या तरुणांवर हल्ले करत आहेत. कचरेवर भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यावर तडीपारीची देखील कारवाई यापूर्वी करण्यात आलेली आहे. तसेच पॉस्को सारख्या गंभीर गुन्ह्यातील तो जामिना वरील आरोपी आहे. मटक्या, आयपीएल सट्टा, बिंगो, खाजगी सावकारकी सारखे अवैध धंदे या भागात राजरोसपणे चालू आहेत.
कचरे टोळीमुळे महिलांचं, नागरिकांच जगण मुश्किल झाल आहे. तरी या टोळीच्या मुसक्या आवळण्यात याव्यात. घरात घुसून महिला भगिनींचा विनयभंग, हल्ले करणाऱ्या या टोळीवर कडक पोलीस कारवाई करण्यात यावी. टोळीकडून सुरू असणारे मटका, आयपीएल सट्टा, बिंगो, खाजगी सावकारकी सारखे अवैध धंदे यांची पाळेमुळे मुळासकट कायमची उखडून टाकण्यात यावीत. परिसरातील महिला, नागरिकांना पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.