महालक्ष्मी देवस्थान विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : किरण काळे ◾ महालक्ष्मी यात्रा उत्सव उत्साहात संपन्न, भाविकांची मोठी गर्दी

अहमदनगर दि.२९ जुलै (प्रतिनिधी) : माळीवाडा येथील शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट मातंग समाज पंच कमिटीच्या महालक्ष्मी मंदिराचा महालक्ष्मी यात्रा उत्सव उत्साहात संपन्न झाला. आषाढी अमावस्ये निमित्त दरवर्षी मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते. भाविकांनी दर्शनासाठी दिवसभर मोठी गर्दी केली होती. महालक्ष्मी देवस्थानच्या विकासासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यावेळी यात्रेनिमित्त भेट दिली असता केले.
यात्रेनिमित्त मंदिरास भेट दिल्याबद्दल काळे यांचा महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट मातंग समाज पंच कमिटीच्या वतीने उमेश साठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उमेश साठे यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब साठे, उपाध्यक्ष ज्योतीताई साठे, अभिनय गायकवाड, निलेश चक्रनारायण, इंजि. सुजित क्षेत्रे, अतुल काळोखे, आदेश साठे, प्रथम साठे, प्रफुल्ल साठे, विशाल साठे, आशिष पारधे, गौरव वैराळ, सुवर्णाताई साठे, संगीताताई साठे, चंद्रकांत वाघमारे, शुभांगी साठे, पूजा साठे आदी उपस्थित होते.
यावेळी काळे म्हणाले की, महालक्ष्मी मातेचे हे मंदिर अत्यंत जागृत देवस्थान आहे. भाविकांच्या भावना या मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत. भाविकांची श्रद्धा या ठिकाणी आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या मंदिराला स्वतः भेट दिली आहे. साठे परिवार मंदिराची सेवा व देखभाल करत असते. या मंदिराचा अधिक विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी मी शासनाकडे निश्चित पाठपुरावा करेल.
महालक्ष्मी यात्रेनिमित्त सकाळी पालखीचे मानकरी पोपटराव धोंडीबा साठे यांच्या निवासस्थानापासून देवीचा कलश व पावलांची मिरवणूक वाजत गाजत मंदिरापर्यंत काढण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. पोतराज मच्छिंद्र शेलार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी देवीचा जागर केला. देवीचा कलश, पावले मंदिरात पोहोचल्यानंतर देवीला पालखीत विराजमान करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.