राजकिय

रस्ते घोटाळा प्रकरणी आयुक्तांसमोरच “भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतय कोण ?” चे झळकवले फलक लेखी आश्वासन देऊनही घोटाळे बहाद्दरांवर कारवाई नाहीच, काँग्रेस आक्रमक भूमिका घेणार – किरण काळे

 

अहमदनगर दि.२५ ऑगस्ट( प्रतिनिधी) : अधिकारी, लोकप्रतिनिधी, ठेकेदारांनी संगनमतातून शहरातील रस्त्यांचे वाटोळे केले. ऐन पावसाळ्यात शहरभर खड्डेच खड्डे पहायला मिळत आहेत. काही ठिकाणी संपूर्ण रस्तेच गायब झाले आहेत. यासाठी निकृष्ट कामे जबाबदार असून ती दडपण्यासाठी बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करुन सुमारे २०० कोटीहून अधिक रक्कमेची बिले संगनमताने लाटली गेली. नागरिक मात्र खड्ड्यांमुळे हवालदिल आहेत, असे म्हणत मी काँग्रेसच्या वतीने दिलेल्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर लेखी आश्वासन देऊनही घोटाळे बहाद्दरांवर मनपाने कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे काँग्रेस याबाबत आक्रमक भूमिका घेणार असल्याचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयुक्तांसमोरच “भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतय कोण ?” चे फलक झळकवले. यावेळी आयुक्त पंकज जावळे व किरण काळे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. काळेंनी आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले. १ जुलैला काळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करणार होते. मात्र ३१ जून रोजी पोलिसांनी त्यांना कार्यकर्त्यांसह बैठकीतून ताब्यात घेतले होते. आयुक्तांच्या मान्यतेने उपायुक्त व शहर अभियंत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये काळेंना दीड महिन्यांच्या आत बनावट टेस्ट रिपोर्टच्या कागदपत्रांची पडताळणी करून कायदेशीर कारवाई करण्याचे व बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेल्या कामांची सक्षम प्राधिकरणाकडून चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. याबाबत आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती स्वतः जावळे यांनी दिल्याचा दावा काळेंनी केला आहे.

काळे म्हणाले, शहरात रस्त्यांच्या कामात कोणताच घोटाळा झाला नसल्याचा काही नगरसेवकांनी महासभेमध्ये कांगावा करत भ्रष्टाचाऱ्यांना अभय देण्याचा प्रयत्न केला. अशा नगरसेवकांच्या ही प्रभागात नागरिक रोज खड्ड्यातून जीव मुठीत धरत करत प्रवास करतात. नगरसेवकांनी भ्रष्टाचार न झाल्याची प्रमाणपत्र मनपाच्या नावे देण्याचे जाहीर आवाहन त्या नगरसेवकांना काँग्रेसने केले होते. माञ एकाही नगरसेवकाची तशी हिंमत झाली नाही. सगळ्यांनीच पळ काढला. शहरातील रस्त्यांच्या कामांच्या जाहीर गुणवत्ता तपासणीसाठी मनपाच्या पथकाला काँग्रेसने वर्गणीतून खर्च करत पाचारण करून देखील पथकच आले नव्हते. शहराचे आमदार, नगरसेवक, आयुक्त, शहर अभियंता हे देखील या चाचणीला सामोरे जाण्यासाठी बोलावूनही आले नाही. ज्यांनी शहराला खड्ड्यात घालण्यासाठी मलिदा लाटला आहे त्यांच्यात जनतेला सामोरे जाण्याची हिंमत नसल्याचा घाणाघात काळे यांनी केला आहे.

याबाबत काँग्रेसने शासकीय तंत्रनिकेतनकडे देखील तक्रार केली होती. त्याबाबत तंत्रनिकेतनच्या प्रमुखांची भेट घेऊन चर्चा केली जाणार आहे. यानंतर शहराच्या विविध भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेऊन त्यामध्ये या घोटाळ्यातील दोषींवर कायदेशीर कारवाईचा फास आवळण्यासाठी लोकसहभागातून विशेष मोहीम आखत आक्रमक भूमिका घेणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. नागरिकांना शहरातून प्रवास करताना मरण यातना देणाऱ्यांना काँग्रेस कदापि माफ करणार नसल्याचा इशारा काळेंनी दिला आहे.

यावेळी दशरथ शिंदे, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, सुनील क्षेत्रे, अलतमश जरीवाला, अभिनय गायकवाड, हनीफ जहागीरदार, गौरव घोरपडे, इंजि. सुजित क्षेत्रे, रतिलाल भंडारी, आप्पासाहेब लांडगे, प्रशांत जाधव, किशोर कांबळे, आकाश जाधव, राहुल सावंत, उषा भगत, राणी पंडित, सुनिता भाकरे, मिनाज सय्यद, पुनम वन्नम, जरीना पठाण, आकाश आल्हाट, सोफियान रंगरेज, समीर सय्यद, आनंद जवंजाळ, राकेश वाघमारे, शंकर आव्हाड आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे