भाजपाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा घनकचरा प्रकल्पात गैरव्यवहार आरोप बिनबुडाचा आणि अर्धवट माहितीचा – कर्जत नगरपंचायत

कर्जत दि.१८ जुलै (प्रतिनिधी) भाजपाच्या त्या राजकीय पदाधिकाऱ्यांने कोणतीही सत्य परिस्थिती न पाहता केवळ राजकीय द्वेषापोटी कर्जत नगरपंचायतीवर बिनबुडाचे आरोप केले आहे. त्यांनी वास्तविक परिस्थितीचा अभ्यास करून त्यावर भाष्य केले असते तर निश्चित आमच्या चुका सुधारणा करण्यास वाव मिळाला असता मात्र अर्धवट माहितीच्या आधारे त्यांनी केलेली टिप्पणी निषेधार्ह आहे असा घणाघात नगराध्यक्षा उषा राऊत आणि उपनगराध्यक्षा रोहिणी घुले यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपाचे पदाधिकारी शरद मेहत्रे यांचे सर्व आरोप कर्जत नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यानी यावेळी खोडले.
भाजपाचे शरद मेहत्रे यांनी कर्जत नगरपंचायत घनकचरा प्रकल्पामध्ये खोटी बिले काढून गैरव्यवहार करीत असल्याचा आरोप एका वृत्तपत्रामध्ये केला होता. या प्रसिद्ध बातमीचा कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत आणि उपनगराध्यक्षा रोहिणी घुले यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाल्या की, विभागीय तांत्रिक तज्ञ यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायती यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या होत्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या पूर्वीच्या तयारीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना देण्यासाठी कार्यालयीन आदेश देण्यात आले होते. सदर नोटीसमध्ये प्रथमचा परिच्छेद हा सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी समान प्रस्तावना स्वरूपात होता. मात्र त्यानंतर त्याच नोटीसमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायत यांनी केलेल्या कार्यनुसार गुणांकन देण्यात आले होते. यामध्ये कर्जत नगरपंचायतीने दरमहा भरत असलेले एमआयएस मधील माहितीमध्ये घनकचरा व्यवस्थापन विषयक बाबी १००% पूर्ण केले असल्याचे नमूद केले आहे. यासह कचरा संकलन १००%, कचरा वर्गीकरण प्रकारात ७० ते ८०% कार्य केले असून यामध्ये सॅनिटरी कचरा यांचे वेगवेगळे डबे केलेले नसल्याने यात कर्जत नगरपंचायतीचे गुणांकन कमी झालेले निदर्शनास आले आहे. मात्र त्यावर नगरपंचायत घंटागाडीच्या भोतमध्ये सॅनिटरी कचऱ्यासाठी वेगवेगळे डबे लावणार असल्याचे म्हंटले. तसेच कर्जत नगरपंचायत कचऱ्यावर शास्त्रीक्त पद्धती प्रकियेमध्ये देखील १००% काम करीत असून यातील ओला, सुका आणि घरगुती घातक कचऱ्यावर शास्त्रीक्त पद्धती प्रक्रिया पूर्ण केले असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्याच प्रमाणे सॅनिटरी कचऱ्याच्या शास्त्रीक्त पद्धती प्रक्रियासाठी एबी कुमार पुणे या कंपनीबरोबर करार केला असल्याचा खुलासा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. कर्जत नगरपंचायतीकडे ८०० ते १००० घनमीटर बायोमिनींग जुना कचरा शिल्लक असून घनकचरा व्यवस्थापन सविस्तर प्रकल्प अहवालात बायोमिनींग प्रक्रिया मंजूर नाही तसेच त्यासाठी कोणताही निधी उपलब्ध होत नसल्याने तो कचरा शिल्लक असल्याचे स्पष्टीकरण उषा राऊत आणि रोहिणी घुले यांनी पत्रकार परिषदेत दिले. त्यामुळे भाजपाचे मेहत्रे यांनी केवळ स्टंटबाजी करीत राजकीय द्वेषापोटी कर्जत नगरपंचायतीवर केलेले आरोप चुकीचे असून बिनबुडाचे असल्याचे सांगितले. यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, युवक काँग्रेसचे सचिन घुले, नगरसेवक अमृत काळदाते, भाऊसाहेब तोरडमल, सुनील शेलार, पाणी पुरवठ्याचे सभापती भास्कर भैलुमे आदी उपस्थित होते.
******** :
कर्जत नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन विषयक वर्तमानपत्रात आलेली बातमी हि चुकीची असून अर्धवट माहितीतून आलेली आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर ओल्या व सुक्या कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी नगर पंचायत खर्च करते. यात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करणे व सुका कचरा विलगीकृत करून एमपीसीबी मान्यताप्राप्त संस्थेकडे वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आणि पाठवणे कामी तयार करणे या कृती केल्या जातात. या प्रक्रियेत मशीन चालवण्याचा कोणताही खर्च दिला जात नाही. या बाबतचे सर्व पुरावे नगरपंचायत येथे उपलब्ध आहेत. ज्यांना यात शंका वाटत असेल त्यांनी निसंकोच कार्यालयात यावे आणि माहिती घ्यावी.
– गोविंद जाधव
मुख्याधिकारी, कर्जत नगरपंचायत