निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्ष्यांची अन्नसाखळी जिवंत ठेवा : भदाणे
स्नेहबंध’ने पक्ष्यांसाठी अन्न व पाण्यासाठी ठेवले भांडे

अहमदनगर दि.५(प्रतिनिधी) – पशू-पक्षी आनंदी जीवनाचा संदेश देतात. कितीही मोठे संकट असले तरी डगमगायचे नाही हे पशू-पक्ष्यांच्या निरीक्षणातून आपल्याला शिकता येते. सध्या उन्हाळा जाणवू लागला आहे. पक्षी निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्ष्यांची अन्नसाखळी जिवंत ठेवायला हवी, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे यांनी केले.
वाढत्या उन्हामुळे पक्षांची अन्न व पाण्यासाठीची भटंकती थांबवण्यासाठी स्नेहबंध फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. उन्ह्याळ्यात पक्ष्यांसाठी शासकीय विश्रामगृह, आकाशवाणी, जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय, टिळक रोड, बूथ हॉस्पिटल येथे अन्न व पाण्यासाठी भांडे ठेवण्यात आले. या उपक्रमाच्या शुभारंभ शासकीय विश्रामगृहात करण्यात आला. त्या प्रसंगी भदाणे बोलत होते. यावेळी “स्नेहबंध’चे अध्यक्ष उद्धव शिंदे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश काळे, दीपक दातीर, अहमदनगर आकाशवाणी अभियांत्रिकी प्रमुख संगीता उपाध्ये, कार्यक्रम प्रमुख बाबासाहेब खराडे, कार्यक्रम अधिकारी भैय्यालाल टेकाम, बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय आरोटे, लोकमान्य टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत वाघुलकर, मनीषा बारगळ, शिल्पकार बालाजी वल्लाल, हेमंत ढाकेफळकर, संकेत शेलार आदी उपस्थित होते.
आकाशवाणी अभियांत्रिकी प्रमुख संगीता उपाध्ये म्हणाल्या, पशू-पक्षी आनंदी जीवनाचा संदेश देतात. कितीही मोठे संकट असले तरी डगमगायचे नाही हे पशू-पक्ष्यांच्या निरीक्षणातून आपल्याला शिकता येते. सध्या उन्हाळा जाणवू लागला आहे. पाण्यासाठी पशू-पक्ष्यांची धावपळ होत आहे. घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था केल्यास पक्षी आनंदाने येतात.
*******
पर्यावरण संवर्धनाच्या कामातून एक वेगळे समाधान मिळते
पर्यावरण संवर्धनाच्या कामातून एक वेगळे समाधान मिळते. आम्ही शक्य तिथे पर्यावरण संवर्धनासाठी कृतिशील राहत प्रबोधन करीत असतो. समाजातील जागृक नागरिकांनी, शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी व्यक्त केली.