सामाजिक

रेल्वे मालधक्का कामगारांच्या रु. ३ कोटी ४१ लाखांच्या वेतन फरक वसुलीसाठी माथाडी मंडळाची कारवाई सुरु ; हे तर कामगारांच्या लढ्याचे यश, किरण काळेंचे प्रतिपादन

अहमदनगर दि. २१ एप्रिल (प्रतिनिधी) : अहमदनगर रेल्वे माल धक्क्यावरिल कामगारांचा वेतन दरवाढ व वेतन फरक वसुलीसाठी मागील काही महिन्यांपासून लढा सुरू आहे. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे प्रयत्न करत आहेत. मागील महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी काळेंच्या नेतृत्वाखाली कामगारांनी बेमुदत आंदोलन पुकारले होते. यावेळी वसुलीसाठी एक महिन्याच्या आत ठेकेदार हुंडेकर्‍यांवर कारवाईचे लेखी आश्वासन माथाडी मंडळाने दिले होते. त्याप्रमाणे मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. हे कामगारांच्या लढ्याचे यश असल्याचे प्रतिपादन काळेंनी केले आहे.

दरम्यान, आ. थोरातांनी राज्याचे कामगार आयुक्त सतीश देशमुख यांना लेखी पत्र दिले होते. त्यानंतर कारवाईची सूत्र हालली आहेत. कामगारांची काँग्रेसच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी काळे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी तत्कालीन माथाडी सचिवांनी आदेश निर्गमित केला होता. मात्र दाद मिळत नव्हती. कामगारांच्या आंदोलनानंतर आणि आ.थोरातांनी लक्ष घातल्यानंतर प्रशासनाला उशीरा का होईना पण जाग आल्याचे स्वागत आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी हुंडेकरांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईचे लवकरात लवकर आदेश देवून गोरगरीब कामगारांना न्याय द्यावा यासाठी काँग्रेसतर्फे तीव्र लढा उभारला जाईल.

कामगार प्रतिनिधी विलास उबाळे म्हणाले, माथाडी कामगारांना कायद्याचे जरी संरक्षण असले तरी प्रत्यक्षात कोणी वाली उरला नव्हता. हुंडेकरी आणि कामगार कार्यालयाने संगनमत करत कामगारांना चिरडण्याचा प्रयत्न चालवला होता. मात्र आता काँग्रेसची ताकद कामगारांच्या पाठीशी आहे. यामुळे लवकरच वेतन फरक मिळेल असा विश्वास आहे. सुनील भिंगारदिवे म्हणाले, आ. थोरात, काळे यांच्यामुळे कामगार कार्यालयाला दखल घ्यावी लागली. कामगारांनी देखील लढा दिला. कामगारांच्या घामाचा पैसा हुंडेकर्‍यांनी दडवून ठेवला आहे.

दरम्यान, माथाडी मंडळाच्या सचिवांनी महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ च्या कलम १३ च्या उपकलम ५ नुसार वसुली प्रमाणपत्र जारी केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सुमारे ४६ पानांचा वसुली प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये मे. गाडे ट्रान्सपोर्ट (₹ ५८,५८,७४३), मे. एन.सी.ठाणगे अँड सन्स (₹ ३०,७३,९१८), मे. हुंडेकरी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस (₹ ९३,०९,७०९), मे. ठाणगे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रा. लि. (₹ २६,०३,३६४), मे. वाही ट्रान्सपोर्ट कंपनी (₹५८,९२,३९३), मे. शंकर माथाडी हमाल कामगार मजूर सहकारी संस्था मर्यादित (₹ ४२,४१,४८१), मे. दिव्यराज रोडलाईन्स (₹ ११,८२,३९३) यांच्या वैयक्तिक मालमत्तांवर कामगारांच्या सुमारे ₹ ३ कोटी ४१ लाखांच्या वेतन फरक वसुलीसाठी जप्ती कारवाई करण्यात येणार आहे. कामगार प्रशासनाच्या वतीने पहिल्यांदाच एवढी कडक कारवाई करण्यात आली आहे.

बैठकीला विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, अमर डाके, देवराम शिंदे, सचिन लोंढे, गौतम सैंदाणे, दीपक काकडे, सचिन जरे, जयराम आखाडे, राधेश भालेराव, पंडित झेंडे, रोहिदास भालेराव, भाऊसाहेब अनारसे, सलीम शेख, दादा क्षीरसागर, गोरख माने, अंगद महारनवर, नाना दळवी, सुनील नरसाळे, राजेंद्र तरटे, संभाजी महारनवर, ज्ञानदेव कदम, लक्ष्मण पांढरे, महादेव टाकळकर, दत्तात्रय जाधव, दीपक गुंड, निलेश क्षेत्रे, मंगेश एरंडे, किशोर ढवळे, सुमित पळसे, आतिश शिंदे, संतोष भालेराव, अजय साळवे आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे