शहरात फाईट करायची असेल तर किरण काळेच: माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात जिल्हाध्यक्षपदाच्या कारकिर्दीला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काळेंचा गौरव!

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर शहरात काम करणं सोपं नाही, हे मला माहित आहे. शहरात एक सक्षम पर्याय उभा करण्याचे काम काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. किरण काळे चांगलं काम करत आहेत. मी त्यांचं कौतुक करतो. शहरात फाईट करायची असेल तर किरण काळेच, असं म्हणत माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी नगर शहरात आगामी काळात होणाऱ्या राजकीय फाईटसाठी काँग्रेसच्यावतीने काळे यांना ताकदीने मैदानात उतरवणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचा शहरात कार्यकर्ता मेळावा झाला. त्यावेळी आ. थोरात बोलत होते. १४ ऑगस्ट २०२० ला तत्कालीन महसूल मंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नगर शहर दौऱ्यावर आलेल्या बाळासाहेब थोरात यांनी पक्ष शहरात नवीन नेतृत्व देत असून किरण काळे यांच्यावर शहर जिल्हाध्यक्षपदाची धूरा सोपवत असल्याची घोषणा करत काळे यांची निवड जाहीर केली होती. त्याला दोन वर्ष पूर्ण झाली. काळे यांच्या दोन वर्षांच्या संघटनात्मक यशस्वी कारकिर्दी निमित्त आ. थोरात यांनी काळे यांचा हार घालून सत्कार करत गौरव केला. कौतुक केले.
काळे यांचा आ. थोरात यांच्या हस्ते गौरव होत असताना शहरातील कार्यकर्त्यांनी “बाळासाहेब थोरात आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है, किरणभाऊ काळे आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है…” अशा घोषणा देत सभास्थळ दणाणून सोडले होते. यावेळी काळे यांनी आक्रमक भाषण करीत भाजप विरोधातील महाविकास आघाडीतील महत्त्वाचे व वरिष्ठ काँग्रेस नेते असणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्या समोरच शहरातील राष्ट्रवादीच्या भाजपबरोबर असणाऱ्या सलगीवर जोरदार हल्लाबोल केला.
नगर शहरातील खड्डे, दुरावस्था, रखडलेला विकास यावर काळे यांनी बोट ठेवले. दहशतीमुळे शहरातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. बनावट आयटी पार्कचा भांडाफोड केल्याबद्दल माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. रस्त्यांसाठी आसूड मोर्चा काढला, कोविड काळात ऑक्सिजन बेड जंबो सेंटरसाठी आंदोलन केले म्हणून गुन्हे दाखल झाले. काम करत असताना शहरात विरोधकांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाचा पाढाच त्यांनी थोरात यांच्यासमोर वाचला. मात्र किती ही अडचणी आल्या तरी देखील शहर विकासासाठी अविरत लढाई सुरूच राहील, असे यावेळी काळे म्हणाले.
यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, संगमनेर नगराध्यक्ष दुर्गा तांबे, सचिन गुजर, करण ससाने, प्रताप शेळके, राजेंद्र नागवडे, ज्ञानदेव वाफारे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, दशरथ शिंदे, उषा भगत, अभिनय गायकवाड, प्रवीण गीते, सुजित क्षेत्रे, निलेश चक्रनारायण, उमेश साठे, भिंगार काँग्रेस अध्यक्ष सागर चाबुकस्वार, राणी पंडित, प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, माजी नगरसेवक फैय्याज शेख, मोहनराव वाखूरे, स्वप्निल पाठक, निजाम जहागीरदार यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.