कामगार आयुक्तांनी कामगारांच्या दरवाढी संदर्भात मागवीला अहवाल ; किरण काळेंची माहिती

अहमदनगर दि. २४ जून (प्रतिनिधी) : रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांच्या मजुरी, वारई दरवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही दरवाढ मिळावी यासाठी कामगार शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा देत आहेत. राज्याचे माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काळे यांनी सदर प्रश्न राज्याचे कामगार आयुक्त सतीश देशमुख यांच्या दरबारी उपस्थित केला होता. तसे आ.थोरात यांनी आयुक्तांना पत्र दिले होते.
यावर आयुक्तांनी थोरात यांच्या पत्राची गंभीर दखल घेत नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त तथा अहमदनगर माथाडी व असंघटित कामगार मंडळाचे अध्यक्ष नितीन कवले यांना वेतन दरवाढ अंमलबजावणी बाबतचा अहवाल सादर करण्याचे लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत. मागील महिन्यात काळे यांच्या नेतृत्वाखालील कामगार नेते विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, किशोर ढवळे, सुनील नरसाळे, विजय कार्ले, जयराम आखाडे यांच्या शिष्टमंडळाने याबाबत आयुक्त देशमुख यांची मुंबईतील कामगार भवनात भेट घेत चर्चा केली होती.
त्यानंतर आ.थोरात यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने आयुक्तांना सूचना केल्या होत्या. काळे म्हणाले की, मागील सुमारे तीन वर्षांपासून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा दरवाढीचा फरक कामगारांना हुंडेकरी ठेकेदारांनी अदा केलेला नाही. कामगार अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मालधक्क्यावर जीव धोक्यात घालून काम करत असतात. मध्यंतरी एका कामगाराचा काम करत असताना अपघाती मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतरची मदतही अद्याप पर्यंत मयत कामगाराच्या वारसांना मिळालेली नाही. अशा परिस्थितीमध्ये हुंडेकरी यांनी गोरगरीब कामगारांचे कोट्यावधी रूपये थकवले आहेत. ते कामगारांना मिळवून देण्यासाठी आ.थोरात यांच्या माध्यमातून शहर जिल्हा काँग्रेस कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.
याबाबत बोलताना कामगार नेते विलास उबाळे म्हणाले की, मंडळाचे अध्यक्ष कवले यांनी कामगारांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. वास्तविक पाहता वसुली संदर्भात कारवाई सुरू करून दोन महिने उलटले आहेत. आता स्वतः राज्याच्या आयुक्तांनी देखील अहवाल मागविला आहे. त्यामुळे मंडळाने विना विलंब वसुली करण्यासाठी कठोर पावले उचलावीत. सुनील भिंगारदिवे म्हणाले, याबाबत वेळ काढूपणाची भूमिका घेतली गेल्यास पुन्हा एकदा कामगारांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन मंडळाच्या विरोधात छेडण्यात येईल. दरम्यान, लवकरच कामगारांची काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडणार असून मंडळाने कारवाई करण्यास दिरंगाई केल्यास आंदोलनाची रणनीती सदर बैठकीत ठरविण्यात येणार असल्याची माहिती उबाळे, भिंगारदिवे यांनी दिली आहे.