प्रत्येक धर्मीय ग्रंथात माणुसकीला प्रथम स्थान – पोलीस निरीक्षक यादव

कर्जत (प्रतिनिधी) : दि ३०
माणुसकी हाच मोठा धर्म असून प्रत्येकाने ती अंगिकारली पाहिजे. यंदा कडक उन्हात विना अन्न आणि पाण्याशिवाय रोजा पूर्ण करणे कठीण असताना आपण सर्वांनी ती पूर्ण करून आपली भक्ती दाखवली ती निश्चित कौतुकास्पद आहे. आपल्या सर्व रोजेदाराबरोबर इफ्तार पार्टी करताना मनापासून आनंद होत असून आपल्या सर्वांच्या इच्छा-मनोकामना अल्लाह-परमेश्वर पूर्ण करो असे प्रतिपादन कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले. ते आलमगीर मशीद कर्जत येथे पोलीस विभाग आयोजित इफ्तार पार्टीमध्ये बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, सर्व धर्मीय ग्रंथात माणुसकीला प्रथम स्थान देण्यात आले असून सर्वांनी ती अंगिकारने महत्वाचे आहे. कर्जत शहर आणि तालुक्यात सर्व धर्म समभाव आपणास वेळोवेळी प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात, जयंती आणि उत्सवमध्ये दिसून आला हे फार समाधानकारक आहे. येथील प्रत्येक व्यक्ती एक कुटुंब असल्याप्रमाणे वावरत असल्याने जातीय सलोखा कायम अबाधित आहे. पवित्र रमजान महिना आता पूर्णत्वाकडे जात आहे. मागील महिन्याभरापासून कडक उन्हाळ्यात रोजा पूर्ण करून अल्लाह परमेश्वर आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो अशा शुभेच्छा व्यक्त करीत पो नि यादव यांनी रोजेदार यांच्यासोबत इफ्तारी केली.
यावेळी मौलाना युसूफ यांनी कर्जत पोलीस विभागाचे आभार मानत पोनि यादव आणि कर्जत पोलीस विभाग यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक आपल्या मनोगतात व्यक्त केले. यासह कर्जतचा सर्वधर्मीय भाईचारा असाच वृद्धिंगत व्हावा अशी पार्थना केली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आणि रोजेदार उपस्थित होते. शेवटी मौलाना तय्यब यांनी आभार मानले.