किरण काळेंच्या उपोषणाची मुख्यमंत्री तथा नगर विकास कार्यालयाकडून काल सायंकाळी घेण्यात आली दखल

मंत्रालय – मुंबई : मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हेच नगर विकास खात्याचे देखील मंत्री आहेत. आज ते उपलब्ध नव्हते. सायंकाळी ५.३० वाजता सहसचिव व्यंकटेश भट यांनी किरण काळेंशी संवाद साधत मागणी बाबत उचित कार्यवाही करण्याची संबंधितांना तात्काळ सूचना करण्यात येईल असे समक्ष चर्चा करत आश्वासन दिले. त्यानंतर एक दिवसीय लाक्षणीक उपोषण समाप्त करण्यात आले.
दरम्यान काळे यांच्या मुंबईतील उपोषणाच्या दणक्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने काँग्रेसच्या मागण्यांची गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री कार्यालयाने देखील काळे यांनी यापूर्वी ३१ ऑक्टोबर रोजी रस्ते आणि खड्ड्यांच्या संदर्भात केलेल्या मागण्यांच्या संदर्भात नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांना पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत.
काळे यांच्या मुंबईतील उपोषणाच्या पवित्र्यामुळे नगर विकास प्रशासन खडबडून जागे झाले असून नगरकरांना लवकरच रस्त्यांच्या प्रश्नाबाबत दिलासा मिळण्याची शक्यता यातून निर्माण झाली आहे.