सोनिया गांधींचे खाजगी सचिव पी. माधवन, काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस खा.के.सी. वेणुगोपाल यांच्याशी किरण काळेंची चर्चा
अखिल भारतीय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत घेतला नगर काँग्रेसचा संघटनात्मक आढावा

दिल्ली दि.२२ (प्रतिनिधी): काँग्रेस हायकमांड, राष्ट्रीय अध्यक्षा खा.सोनिया गांधी यांचे खाजगी सचिव पी. पी. माधवन यांची शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी गांधी यांच्या १०, जनपथ येथील निवासस्थानी भेट घेतली आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. के. सी. वेणुगोपाल यांची देखील काळे यांनी भेट घेतली आहे. अखिल भारतीय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीमध्ये नगर काँग्रेसचा संघटनात्मक आढावा काळे यांच्याकडून घेतला आहे. यावेळी पक्षाच्या संघटनात्मक बाबींबद्दल चर्चा झाल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
किरण काळे हे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, सांस्कृतिक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांच्यासह सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या घेतलेल्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत दिल्लीतून माहिती देताना किरण काळे म्हणाले की, काँग्रेस सध्या देशात अडचणीच्या स्थितीतून जात आहे. असे असेल तरी देखील सामान्य कार्यकर्ता हाच पक्षाचा केंद्रबिंदू आणि कणा आहे. महाराष्ट्रा सारख्या महत्त्वाच्या राज्यामध्ये अहमदनगरचे राजकीय महत्त्व मोठे आहे. नगर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना अधिक बळ देण्याची दिल्लीतील नेतृत्वाची भूमिका आहे. त्यामुळे या पुढील काळात नगरमध्ये संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पक्ष जोमाने काम करणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
सोनिया गांधी यांचे सचिव पी. पी. माधवन यांच्याशी काळे यांची तब्बल वीस मिनिटे चर्चा झाली आहे. पुढील महिन्यात सोनिया गांधी यांची देखील भेट घेणार असल्याचे काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. अहमदनगर मध्ये पक्षाच्या सुरू असणाऱ्या संघटनात्मक कामाबद्दल समाधान व्यक्त करत दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांनी काळे यांना अधिक जोमाने काम करत संघटन मजबूत करण्याच्या सूचना या चर्चेच्या वेळी दिल्या आहेत. दिल्ली दौरा आटोपून काळे हे लवकरच मुंबईत पोहोचणार असून मुंबईत ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन संघटनात्मक बाबींवर चर्चा करणार आहेत.
पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल काँग्रेससाठी निराशाजनक आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आहे. पक्षाची राज्यात ताकद वाढावी यासाठी दिल्लीने महाराष्ट्रात अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान काळे यांनी सोनिया गांधी यांना नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला भेट देण्यासाठी व नगरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निमंत्रण दिले आहे. तसेच भुईकोट किल्ल्याला नॅशनल हेरिटेजचा दर्जा मिळावा, नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू व्हावी या मागण्यांकडे पक्षाचे राज्यसभा खा. के. सी. वेणुगोपाल यांचे लक्ष वेधले आहे.