सामाजिक

वीज पुरवठा तातडीने सुरळीत करा, अन्यथा काँग्रेस नागरिकांसह रस्त्यावर उतरेल : किरण काळे

अहमदनगर दि. ११ एप्रिल (प्रतिनिधी ): मागील सुमारे दोन दिवसांपासून नगर शहरातील अनेक भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो अद्यापही सुरळीत झालेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. महावितरणने नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. तातडीने वीस पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा काँग्रेस नागरिकांसह रस्त्यावर उतरेल, असा इशारा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे. दरम्यान, काळे यांनी शहराचे कार्यकारी अभियंता लहामगे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत याबाबत नागरिकांच्या वतीने त्यांचे लक्ष वेधले असून सूचना केल्या आहेत.

अजूनही उपनगरांच्या अनेक भागांमध्ये वीज सुरू झालेली नाही. सुमारे दोन दिवसांपासून वीज खंडित असल्यामुळे लोकांची पाण्याची गैरसोय झाली आहे. टाक्या रिकाम्या झाल्या आहेत. उन्हाळा असल्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण आहेत. डासांचे प्रमाण देखील वाढले आहे. व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे. घरामधील फ्रिज बंद असल्यामुळे खाद्यपदार्थ देखील खराब होत असल्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे. याबाबत नागरिकांनी काळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर काळेंनी काही भागांमध्ये भेटी देत पाहणी करून महावितरणला याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.

नागरिकांचा वाढता रोष पाहता याबाबत तातडीने दिलासा न मिळाल्यास काँग्रेसने नागरिकांसह थेट रस्त्यावर उतरत तीव्र भूमिका घेण्याचा इशारा दिलाआहे. रविवारी सकाळी देखील काही नागरिकांच्या समूहाने झोपडी कॅन्टीन येथे रास्ता रोको काही काळासाठी केला होता. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तो मागे घेण्यात आला. सावेडी उपनगरासाठी प्रोफेसर चौकात असणारे महावितरणचे कार्यालय मागील दोन दिवसांपासून बंद असून या कार्यालयातील फोन देखील कर्मचारी उचलत नाहीत. नागरिकांना माहिती देत नाहीत. याबाबत काळे यांनी कार्यकारी अभियंता यांना अवगत केले असता त्यांनी यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करत असल्याचे सांगितले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे