जनतेसाठीची महागाई, बेरोजगारी विरोधातील लढाई सुद्धा काँग्रेस जिंकेल – किरण काळे आजादी गौरव पदयात्रा व संवाद कार्यक्रमानिमित्त काँग्रेसचा नागरिकांशी संवाद

अहमदनगर (प्रतिनिधी) : दीडशे वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केले. सन १९८५ साली स्थापना झालेल्या काँग्रेसने देशाच्या कानाकोपऱ्यात जात जनतेला एकत्रित करत अभूतपूर्व स्वातंत्र्यलढा उभारला आणि तो जिंकला. स्वातंत्र्य म्हणून आज ७५ वर्ष झाली आहेत. पण आज देशामध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. गॅस, डिझेल, पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. बेरोजगारीमुळे तरुणाई हवालदिल झाली आहे जसा देशासाठी स्वातंत्र्यलढा काँग्रेसने जिंकला, तसेच महागाई, बेरोजगारी विरोधातील लढाई सुद्धा काँग्रेस जनतेसाठी जिंकेल, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
काँग्रेसच्या वतीने आजादी गौरव पदयात्रा व संवाद कार्यक्रमाचे आयोजन शहरामध्ये सप्ताहभर करण्यात आले आहे. सावेडी उपनगरातील प्रभागस्तरावरील आयोजित कार्यक्रमात काळे बोलत होते. तत्पूर्वी प्रभागांतील पदयात्रेदरम्यान नागरिक, दुकानदार, फेरीवाले, भाजीवाले यांच्या भेटी घेत त्यांना गुलाब पुष्प वितरित करत देशाच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा किरण काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नागरिकांना दिल्या. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला नगर शहर व ग्रामीण जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून येणाऱ्या पदयात्रांचा एकत्रित भव्य समारोप माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली मेळावा घेऊन होणार आहे.
किरण काळे यावेळी म्हणाले की, काँग्रेसने देशाला काय दिले असा सवाल विरोधक विचारतात. ज्या, ज्या गोष्टींवर आजचा भारत अभिमानाने उभा आहे, त्या सर्व गोष्टी काँग्रेसनेच केल्या आहेत. काँग्रेसने उभ्या केलेल्या संस्था विक्री करण्याचा विक्रम मोदी सरकारने चालविला आहे. देशामध्ये आज डिजिटल इंडियाचा इव्हेंट मोदी सरकार करीत आहे. मात्र डिजिटल इंडियाची मूलभूत पायाभरणी आणि त्यावर कळस चढवण्याचे काम यापूर्वीच भारतरत्न स्व.राजीव गांधी यांनी देशामध्ये केली आहे. हे जनतेला माहित आहे.
पूर्वी गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किमती काँग्रेसच्या काळात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या होत्या. मात्र आता महिला भगिनींचे किचनचे बजेट पूर्ण कोलमडले आहे. घरात महिन्याच्या सुरुवातीलाच सामान्य माणसाचा खिसा रिकामा होत आहे. तरुणाईला चांगलं शिक्षण घेऊन सुद्धा पकोडे तळण्याची वेळ या देशात आली आहे. बेरोजगारीच्या बाबतीत राष्ट्रीयस्तरावर जे चित्र आहे त्याहीपेक्षा विदारक चित्र नगर शहरातील तरुणांच्या बेरोजगारीच्या बाबतीत आहे. काहींनी निवडणुकी पुरते रोजगाराच्या नावाखाली आयटी पार्क उभा केल्याचा बनाव करून l शहरातल्या हजारो तरुणांची, त्यांच्या पालकांची केलेली फसवणुक आजही नगरकर विसरलेले नाहित, असे किरण काळे यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे त्यांच्या पुढाकारातून प्रभागस्तरीय पदयात्रेच्या संवाद कार्यक्रमाचा समारोप पार पडला. यावेळी ब्लॉक काँग्रेस उपाध्यक्ष अशोक शिंदे, काँग्रेसचे माजी नगरसेवक फैय्याज शेख, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, निलेशदादा चक्रनारायण, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, उमेशभाऊ साठे, नगर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पै. दीपक जपकर, शाहू होले, विद्यार्थी काँग्रेसचे अतुल काळोखे, संतोष रोकडे, संदीप भिंगारदिवे, सुरेश शिंदे, रामदास शिंदे, संतोष धनगर, बाळू शिंदे, सागर शिंदे, नारायण धनगर, गोविंद धनगर, गोरख धनगर आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.