जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विद्युत घंटागाडी देण्याचा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम :पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

अहमदनगर, दि.01 जुलै (प्रतिनिधी) – देशाचा खऱ्या अर्थाने विकास साधावयाचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे. गावे स्वच्छ व्हावीत, स्वयंपूर्ण व्हावीत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अधिक गती देण्यासाठी ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विद्युत घंटागाडी वितरणाचा जिल्हा परिषदेचा हा उपक्रम राज्यातील पहिला अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत स्वचछ भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी व वाहतुकीसाठी तीन चाकी विद्युत घंटागाड्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे, राहुल शेळके, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच गावांच्या सर्वांगिण विकासावर शासनाचा भर देण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत आपल्या जिल्ह्यासाठी ४ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या निधीतून पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठ्याची कामे करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गावातील गावक-यांच्या विविध समस्या सोडवून गावाचा विकास साधण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात यावेत. राज्यातील प्रत्येक बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार निर्मितीवर शासन भर देत आहे. जिल्हा परिषदेमार्फत वितरित करण्यात आलेल्या विद्युत घंटागाड्या आपल्या अहमदनगर येथील एम आय डी सी तील उद्योग समुहात तयार झाल्या असून ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार डॉ. सुजय विखे-पाटील म्हणाले की, लोकसंख्या वाढीमुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील कचऱ्याच्या संकलनासाठी विद्युत घंटागाड्यांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. विद्युत घंटागाड्या असल्याने पेट्रोल व डिझेलचा खर्च वाचून गावाची स्वछता होणार आहे.
देशात मेक इन इंडिया संकल्पनेप्रमाणे विद्युत घंटागाड्यांची अहमदगनरमध्ये निर्मिती करण्यात आल्याने मेक इन अहमदनगर असे म्हणायला हरकत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अशा प्रकाराच्या घंटागाड्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचातींना उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतुन निधीची तरतुद करण्यात येईल. जिल्ह्यातील गावे सक्षम करण्यासाठी, बचत गटांना स्टॉल, जिल्हा परिषदेच्या शाळेच्या खोल्या बांधकाम या कामांसाठी मागील वर्षात निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. विद्यमान सरकार हे जनतेच्या हिताचे सरकार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायतींना पुढे येण्याची गरज असून कचरामुक्त गाव ही संकल्पना राबविणे आवश्यक आहे. स्वच्छतेची चळवळ गावात या माध्यमातुन उभी राहिली पाहिजे. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींना कचरा संकलन व वाहतुकीसाठी तीन चाकी विद्युत घंटागाड्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
*75 विद्युत घंटागाड्यांचे वाटप*
14 व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन एकुण 177 विद्युत घंटागाड्या खरेदी करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 75 विद्युत घंटागाड्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये राहुरी तालुक्यासाठी 10, शेवगांव 8, पाथर्डी 10, जामखेड 4, कर्जत 8, श्रीगोंदा 12, पारनेर 10 तर अहमदनगर तालुक्यासाठी 13 घंटागाड्यांचे वितरण करण्यात आले.