“मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात शिस्तबद्धपणे व काटेकोरपणे राबवा एकही पात्र महिला भगिनी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहमदनगर दि. 1 जुलै (प्रतिनिधी )महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा व्हावी व त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र व गरजू महिला भगिनींना देण्यात यावा. एकही पात्र महिला भगिनी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा अग्रेसर राहील यादृष्टीने योजना अतिशय शिस्तबद्धपणे व काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
“मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नारायण कराळे हे प्रत्यक्ष तर सर्व गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, परियोजना अधिकारी, महानगरपालिका अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री सालीमठ म्हणाले की, येत्या १ जुलैपासून योजना राबविण्यास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार असलेल्या व ज्यांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार पेक्षा अधिक नाही अश्या महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांची ही अतिशय महत्वाकांक्षी योजना असून या योजनेला गती देत “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण ही योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिले.
अहमदनगर जिल्हा विस्ताराने व लोकसंख्येने अधिक मोठा असल्याने जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील गरजू व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी
महिलांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेणे आवश्यक असून या कामी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, वॉर्ड अधिकारी यांचा सहभाग महत्वाचा ठरणार असल्याने
यादृष्टीने यंत्रणांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिल्या.
*”मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात मिशन मोडवर राबवा – आशिष येरेकर*
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर म्हणाले की, जिल्ह्यातील एकल महिलांबरोबरच प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळेल यासाठी “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात मिशन मोडवर राबविण्यात यावी. अंगणवाडी सेविका, ग्रामसेवकांनी महिलांना एकत्रित करून योजनेचे महत्व समजून सांगत समन्वयातून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
योजना राबविण्यासाठी अतिशय कालबद्ध कार्यक्रम शासनाकडून देण्यात आला असल्याचे सांगत योजनेच्या लाभासाठी १ जुलै पासून अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होणार असून १५ जुलै ही अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख असणार आहे. १६ जुलै रोजी तात्पुरती यादी प्रकाशन होणार असून १६ ते २० जुलै या कालावधीत तात्पुरत्या यादीवरील तक्रारी व हरकती प्राप्त करण्यात येणार आहेत. २१ ते ३० जुलै दरम्यान तक्रारी, हरकतीचे निराकरण करून १ ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. १० ऑगस्ट लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई केवायसी तर १४ ऑगस्ट लाभार्थी निधी हस्तांतरण त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत निधी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. ही योजना गतीने राबवून गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.