सामाजिक

उपवर्गीकरण रद्द करा, संविधान वाचवा; ६ ऑक्टोबरला अहिल्यानगरात विराट मोर्चा सरकारने उपवर्गीकरणाचा घाट मागे घ्यावा; अन्यथा हिवाळी अधिवेशनात विधानभवनाला घेराव- आनंदराज आंबेडकर

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 6 सप्टेंबर : (प्रतिनिधी)- अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध करत हा निर्णय तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी ६ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर शहरात विराट संविधान बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हाभरातील आंबेडकरी समाजासह विविध सामाजिक संघटना, शासकीय सेवानिवृत्त कर्मचारी व संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.
महाराष्ट्र विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. उपवर्गीकरणाचा घाट सरकारने तातडीने मागे घ्यावा. अन्यथा आगामी हिवाळी अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालण्यात येईल,असा इशारा त्यांनी दिला. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची तसेच विविध घटकांमध्ये संघर्षाचे वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या अनुसूचित जातींच्या यादीत बदल करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे मत त्यांनी मांडले.
“आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचे धोरण हे आरक्षण व्यवस्था कमकुवत करण्याच्या दिशेने असल्याचा आरोपही त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. विविध समाजघटकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याऐवजी सामाजिक न्याय आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाभरातून समाजबांधव सहभागी होणार
६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संविधान बचाव मोर्चात अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध अनुसूचित जातींचे घटक, सामाजिक संघटना, कर्मचारी संघटना आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेईपर्यंत संविधान व सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धारही पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.
यावेळी नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे, सुमेध गायकवाड, महेश भोसले,सुरेश भिंगारदिवे किरण दाभाडे, निवृत्ती आरु सर, सिद्धार्थ आढाव, अमित काळे, गौतमी भिंगारदिवे, प्रा. जाधव एल बी, विशाल कांबळे, विलास साठे, जयश्री गायकवाड, समीर भिंगारदिवे, अजिंक्य भिंगारदिवे, सुनील शिंदे, मृणाल भिंगारदिवे, शनेश्र्वर पवार, अजय पाखरे, निखिल सूर्यवंशी, राजेंद्र उबाळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांनी ६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव मोर्चात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चाला बळ द्यावे, असे आवाहन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे