राजकिय

मविआचे नेते खा. संजय राऊतांवर राजकीय आकसातून गुन्हा दाखल करण्यात आल्याची किरण काळेंची टीका! प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले होऊ नये – काळे

अहमदनगर दि. 18 मे (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूक प्रचारसभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांच्या विरोधात शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सडकून टीका केली आहे. काळे म्हणाले, सभा नगर शहरात ८ मेला झाली. त्यात राऊत यांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. गुन्हा दाखल करायचा होता तर तो त्याच रात्री सभेनंतर तात्काळ करायला हवा होता. मात्र दहा दिवसानंतर हा गुन्हा दाखल केला गेला आहे. राजकीय आकसातून या गोष्टी केल्या जात असल्याची टीका काळे यांनी केली आहे. पोलीस प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले होऊ नये, असा सल्ला देखील त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

राऊत यांच्या सभेतील वक्तव्या संदर्भात पोलीस अंमलदार अतुल काजळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी राऊत नगरमध्ये आले होते व त्यांची ८ मे रोजी क्लेरा ब्रूस विद्यालयाच्या मैदानावर प्रचार सभा झाली होती. या सभेत त्यांनी प्रक्षोभक व्यक्तव्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेब याचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. ती जी माती आहे ती औरंगाजेबाची माती आहे. त्या मातीतले हे दोन व्यापारी आहेत. औरंगजेबचा जन्म नरेंद्र मोदींच्या गावात झाला आहे, इतिहास पहा तुम्ही. दावत नावाच गाव आहे, अहमदाबादच्या बाजूला. औरंगजेब तेथे जन्माला आला आहे. त्यामुळे आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने वागत आहेत. २७ वर्षे तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणलेली आहे. तेव्हा ‘नरेंद्र मोदी तू कौन है’, असे वक्तव्य राऊत यांनी प्रचारसभेत केले होते. याप्रकरणी राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण काळे म्हणाले, केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या देशातील ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या यंत्रणांचा गैरवापर मागील दहा वर्षांमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. पोलीस हा राज्य सरकारचा विषय आहे. आता या यंत्रणाचा देखील सरकार कडून गैरवापर सुरू आहे. एखाद्या वक्तव्याची सोयीस्कररीत्या चिरफाड करून राजकीय आकसातून गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा महाराष्ट्र आहे. दिल्ली पुढे महाराष्ट्राला झुकविण्याचे आजवर अनेक प्रयत्न झाले. पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानी नेत्यांनी ते मनसुबे हाणून पाडले. संजय राऊत यांच्यावर यापूर्वी देखील सत्तेचा गैरवापर करून खोट्या नाट्या कारवाया करण्यात आल्या. त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. मात्र ते लढवय्ये आहेत. ते थांबले नाहीत आणि थांबणार ही नाहीत, असा ठाम विश्वास काळे यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे